कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
यामध्ये कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे मुस्लिम वाडी येथील नदिप अब्दुल रेहमान शेख,(२४,सध्या रा.पिंगुळी गुढीपुर, शिक्षक कॉलनी) व हादि अब्दुल बारी खान(३५,संध्या रा.आंबेडकर नगर, कुडाळ,मुळ बलरामपुर उत्तर प्रदेश) या दोघांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे .याबाबतचे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिले असल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
नदीम शेख याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. कुडाळ पोलीस स्थानक येथील रेकॉर्डवर नदीम शेख यांच्यावर विनयभंग,चोरी घरफोडी, शासकीय अधिकाऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे जवळपास ८ गुन्हे दाखल होते. गुन्हा दाखल करण्याच्या वेळी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. त्याच्या वर्तणूकीत सुधारणा न झाल्याने कुडाळ पोलिसांनी दि.२५ जुलै २०२४ रोजी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी,कुडाळ यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कुडाळ यांनी सदर अभिलेखा वरील आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळून व गोपनीय साक्षीदार यांच्या जबाबाचे अवलोकन करून त्याला २ वर्षाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आरोपी सध्या सावंतवाडी येथील कारागृहात बंद असल्याने बाहेर येताच त्याला सदर आदेशाची बजावणी करून जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येणार आहे. आदिम शेख याने दि.१८ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ तहसीलचे प्रशिक्षणार्थी नायाब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या गुन्ह्यातच तो न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी जेलमध्ये आहे. त्याच्यावर २०१७ पासून आतापर्यंत ८ गुन्हे दाखल आहेत.
हादि अब्दुल बारी खान(३५,संध्या रा.आंबेडकर नगर, कुडाळ,मुळ बलरामपुर उत्तर प्रदेश) याच्यावर गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल होते. सन २०२२ मध्ये जीवे ठार मारण्याचा गुन्हा कुडाळ पोलीस स्थानक आवारात घडला होता. तो न्यायालयात तारखांना हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढले होते. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली असुन सद्या तो सावंतवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यालाही कुडाळ उपविभागीय अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २ वर्ष तडीपारचे आदेश दिले आहेत. कुडाळ पोलीस ठाणे अंतर्गत कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केलेले तीन प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत अशी माहिती श्री.मगदूम यांनी दिली.
