देवगड | प्रतिनिधी
हिंदळे येथील रहिवासी अब्दुल गफूर आगा व फारुख यांच्या जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराच्या भिंतीच्या एका बाजूला मोठे भगदाड मात्र घरातील सर्व साहित्य व घराचे छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.ग्रामस्थांचे शर्तीच्या प्रयत्न तसेच अग्निशामक बंब यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.ही घटना आज गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
उपलब्ध माहितीनुसार हिंदळे येथील अब्दुलगफूर आगा, फारुख आगा यांच्या मालकीच्या जुन्या घरामध्ये व्यवसायानिमित्ताने आपले सांगली येथील शिवपुत्र कुंदारी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होते. आज गुरुवारी सकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे घराला मागील बाजूला आग लागली. त्यावेळी तेथीलच आपल्या नवीन घरातून बाहेर आलेले अब्दुल गफूर आगा यांच्या ही आग निदर्शनास आली. आगीत स्वरूप पाहून त्यांनी घरातील सर्व मंडळींना झोपेतून उठवले तसेच जळत असलेल्या घरातील गाढ झोपत असलेल्या तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढले.त्यानंतर घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला.या स्फोटाचा आवाजाने हिंदळे मिठबाव गाव हादरले. सर्व पंचक्रोशीत गेल्याने आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी धाव घेतली.आगीची माहिती तात्काळ पोलीस पाटील संदीप हिंदळेकर यांना अब्दुल गफूर आगा यांनी दिल्याने त्यांनी देवगड तहसील , पोलिस स्टेशन,नगरपंचायत यांना माहिती दिली.त्यानंतर सकाळी ६ नंतर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळविले. स्थानिक ग्रामस्थानी देखील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्यामुळे आग आटोक्यात आले. पोलीस पाटील संदीप हिंदळेकर,सरपंच मकरंद शिंदे,मनोज जाधव,पंडित अभ्यंकर,योगेश पाटील,सुरेश वानिवडेकर,निलेश पारकर,राहुल पारकर,मिठबाव सरपंच भाई नरे, माजी पंचायत समिती सभापती सुनील पारकर, राजू हिंदळेकर तसेच हिंदळे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
