एकाच वाडीची चार नावे दाखवून 11 लाखांचा अपहार…
नारुर ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रकार; ग्रामस्थांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
कुडाळ (प्रतिनिधी)
एकाच वाडीची चार वेगवेगळी नावे कागदोपत्री दाखवून गेल्या पंधरा वर्षात सुमारे 11 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्या वाडीतील ग्रामस्थांनी केला असून प्रत्यक्षात ज्या कामावरती खर्च दाखवला आहे ती कामेच नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार कुडाळ तालुक्यातील नारुर ग्रामपंचायत क्षेत्रात घडला असून याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांजवळ तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ तालुक्यातील नारुर ग्रामपंचायत विभागाने मागासवर्गीयांच्या नावाने शासनाचा 10 लाख 79 हजार 568 रुपयांचा अपहार गेल्या 15 वर्षात केल्याचे समोर आले आहे. नारूर येथील समतानगर, तांबेवाडी, हरिजनवाडी, कदमवाडी अशी एकाच वाडीची चार नावे दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचे दिसून आले असून याची लेखी तक्रार वाडीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.
नारुर कदमवाडीतील नारूर समतानगर अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी सन 2023 मध्ये 4 लाख 20 हजार 959 रुपये खर्च दाखविण्यात आला, पण प्रत्यक्ष मात्र काम झालेले नाही. त्याचप्रमाणे तांबेवाडी येथे जाणारा रस्ता खडीकरण करण्यासाठी 2019 मध्ये 1 लाख 19 हजार 424 रुपयांचा अपहार करण्यात आला. तसेच मौजे नारुर हरिजनवाडी सरनोबतवाडीकडे जाणार्या रस्त्यावर कॉजवे बांधण्यासाठी सन 2010 /2011 मध्ये 4 लाख 40 हजार रुपयांचे काम करण्यात आले मात्र सदरील काम प्रत्यक्षात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याचप्रमाणे हरिजनवाडी रस्ता तयार करण्यासाठी 2016/ 17 मध्ये 83 हजार 685 रुपये व तोच रस्ता दुरुस्ती करण्यासाठी 15,500 रुपये खर्च करण्यात आला.
ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या पंधरा वर्षात 10 लाख 79 हजार रुपये मागासवर्गीयांच्या वस्तीची वेगवेगळी नावे दाखवून या पैशांचा अपहार केला असून याबाबतची माहिती समोर आल्यानंतर समतानगर येथील काही जागृत ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देऊन केली आहे. तसेच या तक्रारीची प्रत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.गटविकास अधिकारी, मा. समाज कल्याण मंत्री, मा. राज्य मागासवर्गीय आयोग तसेच मा. मुख्यमंत्री साहेब पाठवल्या आहेत.
त्यामुळे या सार्या प्रकाराची दखल स्थानिक आमदार नीलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, गावात सरकार पातळीवरील योजना लोकांना विश्वासात घेऊन आणि योजनांचा लाभ समजावून त्या योग्य पद्धतीने राबविण्यासाठी सरकार ग्रामसेवकाची नियुक्ती करत असते. तेव्हा ग्रामसेवकाकडून चांगल्या कामाची अपेक्षा असते. मात्र, नारुर ग्रामपंचायतीचा कारभार पाहता सर्वच अंदाधुंदी दिसून येते. विकास कामांचा निधी विविध माध्यमातून कशा पद्धतीने लुटता येईल यासाठी सगळे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरी 2010 ते 2023 या काळात झालेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
