कुडाळ प्रतिनिधी
माजी आमदार वैभव नाईक यांच्या कारकिर्दीमध्येच चेंदवण येथील सिद्धिविनायक बिडवलकर याचा खून झाला हे त्यांना माहीत नसणार असे होणार नाही. पण त्यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षात असलेले सिद्धेश शिरसाट यांना पाठीशी घातले नाही कशावरून असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी करून वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाल्मीक कराड होते अशी टीका त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली केली.
शिवसेनेच्या वतीने कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी प्रवक्ते रत्नाकर जोशी, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख रोहित भोगटे तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी सांगितले की, सिद्धिविनायक (प्रकाश) बिडवलकर प्रकरण दोन वर्षांपूर्वी घडले आहे. यातील आरोपी हा उबाठामध्ये सक्रीय कार्यकर्ता होता, त्यावेळी कार्यकाळात वैभव नाईक आमदार होते. आता जनतेने त्यांना रिटायर केले आहे. त्यामुळे आता त्यांना या घटनेची जाग येऊन ते किळसवाणे राजकारण करीत आहेत. सदर आरोपी सिद्धेश शिरसाट आणि आमदार निलेश राणे यांचा काहीही संबंध नाही. तसेच शिवसेनेशी सुद्धा त्याचा संबंध नव्हता. आरोपी सिद्धेश शिरसाट हे शिवसेनेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आलेत. ही घटना आरोपी उबाठामध्ये असताना घडली. आपली राजकीय कारकीर्द राणेंवर टीका करून जिवंत राहण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केली.
*सिंधुदुर्गचा आका कोण?*
ज्यावेळी ही घटना घडली आरोपी सिद्धेश हा उबाठा गटातसक्रिय होता. त्याचा वावर वैभव नाईक यांच्या आजूबाजूला होता. याचे फोटो सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यावेळी आमदार असताना वैभव नाईक गप्प का बसले? कारण सिद्धेश हा त्यांच्या बरोबर होता. त्यामुळे या घटनेला वैभव नाईक यांची मूक संमती होती का? वैभव नाईक हे या घटनेवरून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडशी करत असतील तर त्या काळामध्ये वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाल्मीक कराड होते, याबद्दल आमचे ठाम मत असे जोशी यांनी म्हणाले.
*बीड प्रकरण जोडून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी होतेय?*
उबाठा आणि वैभव नाईक यांची हीच संस्कृती आहे, काहीच काम करायचे नाही आणि कुठले तरी विकासात्मक काम करायला गेले तर त्या कामाला विरोध करायचा हे एककलमी कार्यक्रम माजी खासदार, माजी आमदार हेच करीत आहेत. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी उबाठा गटाकडून सर्व लोकप्रतिनिधी करीत आहेत. असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
