सिंधुदुर्ग | (प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राज्यसभा खासदार शरद पवार हे येत्या गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५ रोजी वेंगुर्ला व शुक्रवार दि.२५ एप्रिल रोजी आंबोली येथे एक दिवसाच्या खाजगी दौऱ्यावर येणार आहेत.
दि.२४ रोजी सकाळी १० वाजता पवार यांचे कोल्हापूर इथून हेलिकॉप्टर ने वेंगुर्ला येथे आगमन होईल. त्यानंतर ११ वाजता बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या वेंगुर्ले फालसंशोधन केंद्राला भेट देऊन केंद्राच्या संशोधन केंद्राची पहाणी करून माहिती घेतील.
ब्राझील मध्ये काजूच्या फळावर( बोंडू) प्रक्रिया करून सरबत, पल्प, व इतर पदार्थ तयार केले जातात. आपल्याकडे असा प्रकल्प व्हावा यासाठी उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दीपक केसरकर हे प्रयत्नशील असून ‘सिंधु-रत्न’योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.मध्यंतरी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीला भेट देऊन पहाणी करून आले आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित व्हावा, शिवाय ठिकठिकाणी असे आणखी प्रकल्प व्हावेत असा प्रयत्न असून या भेटी दरम्यान पवार याची माहिती घेतील. तसेच सद्या या केंद्रात काजू फळाचे सरबत तयार केले जाते, त्या यंत्रसामुग्रीची पहाणी करून माहिती घेतील.
दौर्यात ते वेंगुर्ल्यातील ‘बॅरिस्टर नाथ पै स्मृती व समुदाय केंद्र’ येथे भेट देणार असून, केंद्राची विकास प्रक्रिया आणि तेथे चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेणार आहेत. पवार यांनी यापूर्वी ऑक्टोबर, २०२२ मध्ये नाथ पै यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या स्थळाला भेट दिली होती आणि त्यावेळी या केंद्राच्या आराखड्याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी नाथ पै यांच्यासारख्या थोर व्यक्तीच्या स्मृतीसाठी भव्य स्मारक उभारण्यास आपला पाठिंबा राहील, असे आवर्जून सांगितले होते.
केंद्राच्या औपचारिक उदघाटनानंतर सहा महिन्यांनी पवार पुन्हा एकदा येथे भेट देत आहेत.’बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट’ ह्या संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत व इतर संस्था व संघटनांसोबतच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती घेणार आहेत.
या भेटीदरम्यान,’ जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ‘ आणि ‘ नाथ पै फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक कृषी ज्ञान केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना डिजिटल साधने आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबत प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते शेतीच्या क्षेत्रातील नवकल्पनांशी जोडले जाऊ शकतील.
या कार्यक्रमात विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि वेंगुर्ला परिसरातील नागरिकांना पवार संबोधित करतील, आणि सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करतील. आरवली येथील फोमेंटो हॉटेल मध्ये त्यांचा मुक्काम राहील.
ऊस संशोधन केंद्राला भेट
शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी ११ वा. ते आरवली इथून हेलिकॉप्टरने आंबोली येथे रवाना होतील. त्याठिकाणी असलेल्या ऊस संशोधन केंद्राला ते भेट देऊन पहाणी व संबंधिताशी चर्चा करतील. दुपारी २.३० वा.ते बेळगावला रवाना होतील.