कसाल | प्रतिनिधी
कसाल हायस्कूलचा माजी विद्यार्थी कु. प्रथमेश उमेश जोशी याने MPSC परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश संपादन करत मंत्रालयातील महसूल विभागात नियुक्ती मिळवली. या उल्लेखनीय यशाबद्दल धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल प्रशालेतर्फे त्याचा भव्य सत्कार समारंभ, गुरुदक्षिणा सभागृह कसा ल हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव श्री. यशवंत परब यांनी केले. “ध्येय निश्चित केल्यास परिस्थिती आड येत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रथमेश,” असे सांगत त्यांनी त्याच्या प्रवासावर प्रकाश टाकला.
या वेळी विश्वस्त श्री. अवधूत मालणकर यांनी मनोगत व्यक्त करत म्हटले, “प्रथमेशने ग्रामीण मर्यादांवर मात करत मोठे स्वप्न पाहिले आणि ते यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्याचे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.”प्रथमेश याने बारावीनंतर मर्चंट नेव्हीची परीक्षा उत्तीर्ण करून कोर्स पूर्ण केला व नाशिक येथे नोकरीला लागला. मात्र लॉकडाऊनच्या काळात घरी परतल्यावर त्याने पोलीस भरतीसाठी ग्राउंडची तयारी सुरू केली. त्याचबरोबर ओरोस येथील लायब्ररीत नियमित उपस्थिती लावून अभ्यास सुरू ठेवला. दिवसा अभ्यास आणि रात्री सुमेध लॅबमध्ये नाईट ड्युटी करत त्याने अभ्यासाला अखंड वेळ दिला.
एस. टी. संपाच्या काळात कठीण परिस्थिती उद्भवली. मग त्याने नोकरी सोडून,अभ्यासाला पूर्ण वेळ दिला. श्रीम पवार मॅडम च्या प्रेरणेतून, देवगड महाविद्यालय मधून B Com पूर्ण केले. ३० एप्रिल २०२३ रोजी MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आणि १७ डिसेंबर २०२३ रोजी मुख्य परीक्षा यशस्वीपणे पार पाडली. मित्रांच्या पुस्तकांवर अभ्यास करत, त्यांच्याच वेळापत्रकात आपला अभ्यास समायोजित करत त्याने सातत्य राखले. “जेव्हा जेव्हा संयम संपत आला, तेव्हा तेव्हा निकाल लागला. संयम संपण्याच्या क्षणीच यशाचं एक पाऊल जवळ येतं,” असे मनोगत त्याने व्यक्त केले.त्याच्या अभ्यासात YouTube चा प्रभावी उपयोग, तसेच राज्य मंडळाच्या पाठ्यक्रमावर लक्ष केंद्रीत करून अभ्यास केल्याचा उल्लेख त्याने केला. आता त्याची निवड मंत्रालयात महसूल विभागात झाली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. माळगावकर यांनी आभार मानले. “आजचा दिवस आमच्या प्रशालेसाठी भाग्याचा आहे. प्रथमेशने दाखवलेली लवचिकता आणि सातत्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष श्री. भाई सावंत, सचिव श्री. यशवंत परब, शालेय समिती अध्यक्ष श्री. नवीन बांदेकर, विश्वस्त श्री. अवधूत मालणकर, शालेय समिती सदस्य श्री. विवेकानंद बालम आदी मान्यवर तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. महेंद्रेकर सर यांनी केले.