११ मे रोजी होणार उद्घाटन
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
भाजपा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील करंजे गावात एक भव्य ‘गो-शाळा’ प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाचे उदघाटन येत्या रविवार दि. ११ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
कै.तातू सिताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून ही ‘गोवर्धन गोशाळा’ उभारण्यात आली असून या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यात त्यांनी ही माहिती दिली.
हिरव्या वनराईने नटलेल्या, निसर्गरम्य करंजे गावात सुमारे ७० एकर जागेत ही अत्याधुनिक’ गो-शाळा’ उभारण्यात आली असून त्यामध्ये गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर, आदी भारतातील व महाराष्ट्रातील विविध जातींच्या तसेच खिल्लार, स्थानिक कोकण कपिला अशा सुमारे शंभरहून अधिक गाई ठेवण्यात आल्या आहेत.या गोशाळेत दूधापासून विविध पदार्थ, उत्पादने, तयार करण्यात तसेच त्याची विक्री करण्यात येणार आहे. तसेच गोमूत्रा पासून औषधे व खत, गोबरगॅस, आणि रंग तयार करण्यात येणार आहे अशी माहिती राणे यांनी यावेळी दिली.
गो शाळेसोबतच शेळी -मेंढी पालन,कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे अशीही माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे करंजे व आसपासच्या गावांतील तरुण -तरुणीना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेलच शिवाय या ठिकाणी पशुपालन,दुग्ध व्यवसाय,शेळी -मेंढी पालन, कुक्कुट पालन खत निर्मिती,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयावर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये तज्ञांमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
या गो- शाळेला जोडूनच भाकड गाई सांभाळण्यासाठी एक भव्य शेड उभारण्यात येत आहे. याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन राणे यांनी केले आहे. ही गो शाळा एक धार्मिक पर्यटन स्थळ व्हावं म्हणून याठिकाणी राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे.इथे भेट देणाऱ्या लोकांना चुलीवरचं जेवण मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.महिला बचत गट तयार असेल तर त्याला हे काम दिले जाणार आहे. पत्रकार परिषदेनंतर राणे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना स्वतः फिरून ही गो शाळा दाखवली.
गो-शाळेचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याल्यानंतर कणकवली शहरापासून अवघ्या १२ कि. मी अंतरावर असलेलं करंजे गाव जगाच्या नकाशावर येणार हे मात्र निश्चित. जिल्ह्यातील शेतकरी तरुण -तरुणीनी यातून प्रेरणा घ्यावी आणि जिल्ह्यात गोपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय,वाढीस लगावा हाच उदात्त हेतू यामागे आहे आणि आपले हे स्वप्न पूर्ण व्हावे ही इच्छा मनोमन बाळगून आपण हे पाऊल उचलले आहे अशी भावना राणे यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही या गोशाळेची पाहणी केली.