तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता – आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी

माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आमदार निलेश राणे यांनी आपल्या एक्स सोशल हँडल वरून केली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की,आपल्याला अनेकांना माहित नसेल परशुराम उपरकर म्हणजे कोण, राणे साहेबांच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते त्यानंतर राणेसाहेबांनी शिवसेना सोडली त्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली त्यानंतर हे महाशय मनसेत गेले. मनसेमध्ये गटबजी केली, राज साहेबांनी कार्यकारणी बरखास्त करून याची हकालपट्टी केली. हा ऊबाठात गेला आणि आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही अशी राजकीय अवस्था परशुराम उपरकरची आहे. याचा एकच छंद राणे परिवारावर रोज उठून टीका करायची. 

आज बघायला गेलं तर रिकामटेकडे असलेले वैभव नाईक हे परशुराम उपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहेत. 

वैभव नाईक, काहीतरी नवीन निर्माण करा, स्वतःच्या खिशात हात घाला आणि सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता, लोकं तुमचं नाव लक्षात ठेवतील असं कार्य काहीतरी उभं करा नाहीतर तुमची ओळख राणेंचे विरोधक हीच आयुष्यभर राहणार असे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.