Friday, December 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळ*महावितरणने कारभार सुधारावा ठाकरे सेनेचा इशारा*

*महावितरणने कारभार सुधारावा ठाकरे सेनेचा इशारा*

 

कुडाळ 20

      महावितरणने कारभार सुधारावा. यापुढे वीज पुरवठा खंडित होता नये, पावसाळ्यात वीज ग्राहकांना चांगली सेवा मिळावी. वीज ग्राहकांना विश्वासात न घेता, बसवलेले स्मार्ट प्रिपेड वीज मीटर तात्काळ काढून जुने वीज मीटर बसवावेत, येत्या चार दिवसात याबाबत कार्यवाही झाली पाहीजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने स्मार्ट मीटर काढण्यास भाग पाडले जाईल, असा आक्रमक इशारा कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेने महावितरणला दिला.

     कुडाळ शहर व तालुक्यातील विविध वीज समस्यांबाबत कुडाळ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी महावितरणचे उप कार्यकारी अधिकारी विजय जाधव व सहाय्यक अभियंता प्रकल्प यलगुकर यांच्याशी चर्चा करीत वीज समस्यांबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यासह अनेक वीज समस्यांबाबत त्यांना शिवसैनिकांनी जाब विचारला. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, बांव सरपंच अनंत आसोलकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, गोट्या चव्हाण, सचिन ठाकूर आदींसह वीज ग्राहक उपस्थित होते.

      वारंवार लाईट बंद केली जाते, लाईट गेल्यावर अधिकारी फोन उचलत नाहीत, लोकांना प्रतिसाद देत नाहीत, ग्राहकांना विश्वासात न घेता, त्रासदायक ठरणारे स्मार्ट प्रिपेड वीज मीटर परस्पर बसविले जातात, ही महावितरणची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही. काही महिन्यांपूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रिपेड वीज मीटर विरोधात महावितरणवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा अधिक्षक अभियंता यांनी हे स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यात येणार नाहीत, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र तरीही अदानी कंपनी मार्फत हे स्मार्ट प्रिपेड मीटर जबरदस्तीने बसविले जात आहेत. हे मीटर विज ग्राहकांना त्रासदायक ठरणारे आहेत. त्यामुळे जेथे जेथे हे स्मार्ट प्रिपेड वीज मीटर बसविले आहेत ते त्वरीत काढून जुने मीटर बसवावेत, चार दिवसात याबाबत कार्यवाही झाली पाहीजे, अन्यथा येत्या सोमवार 26 मे रोजी पुन्हा महावितरण कार्यालयावर धडक देऊ, असा आक्रमक इशारा शिवसैनिकांनी दिला. तसेच याबाबतचे निवेदन देण्यात आले. दरम्यान महावितरणची मान्सूनपूर्व कामे चालू असल्याने वीज पुरवठा काही वेळा खंडित केला जातो, परंतू यापुढे तसे होणार नाही, असे अधिका-यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!