ज्येष्ठ झांज वादक शांताराम तुकाराम राणे उर्फ बाबी गावकर (वय ९५) यांचे मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन..

कुडाळ | प्रतिनिधी 

    तालुक्यातील कवठी गावकरवाडी येथील रहिवासी व ज्येष्ठ झांज वादक शांताराम तुकाराम राणे उर्फ बाबी गावकर (वय ९५) यांचे मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

      दशावताराचा वारसा असलेल्या कवठी गावातील शांताराम राणे यांनी आपल्या झांज वादनाच्या कलेतून नाट्यक्षेत्रातील वडिलांचा वारसा पुढे चालविला. वयाच्या ३० व्या वर्षापासून त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी गोरे दशावतार कंपनीमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. सुरूवातीला पेटारा वाहकाचे काम केले. त्यावेळी वाहतुकीची कोणतीही सुविधा नसताना नाटक संपल्यानंतर दुसऱ्यादिवशी मैलोमैल पायी चालत दुसऱ्या गावी पेटारा वाहण्याचे काम त्यांनी केले. पेटारा वाहण्याचे काम करत असतानाच आचारी महणूनही जबाबदारी स्वीकारली. असे करत करत काही वर्षांनी त्यांच्याकडे नाटकामध्ये झांजवादनाची जबाबदारी सोपविण्यात आली. मुळातच राणे यांच्या घराण्याला दशावतार कलेची परंपरा असल्यामुळे झांज वादनाची कला जोपासत त्यांनी आपल्या ठेकेबाज झांज वादनाने नाट्य रसिकांच्या मनात आपला ठसा उमटविला होता.

  वालावलकर, चेंदवणकर आणि पार्सेकर या दशावतार कंपन्यांमध्ये त्यांनी झाज वादनाबरोबरच वेळप्रसंगी इतर कला सादर करून आपला वडिलोपार्जित नाट्य कलेचा वारसा जोपासण्याचे काम केले. अनेक कलाकारांच्या सानिध्यात वावरत असताना त्यांच्या मागदर्शनाखाली पेटारा वाहण्यापासून झांजवादक ते अगदी अडल्यावेळी एखादी नाटकातील भूमिका करण्यापर्यंतही त्यांनी काम केले. आपल्या उपजीवकेसाठी चेंदवणकर दशावतार नाट्य कंपनीमधून आपल्या कामाला सुरुवात करणारे शांताराम राणे यांनी नाट्यक्षेत्रात सुमारे २५ वर्षे वाहून घेतले. त्यानंतर वय वाढल्यामुळे त्यांनी या क्षेत्रातून वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्ती स्वीकारली. ते कवठी येथील श्री सातेरी महादेवादी देवस्थानकडील मानकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार तथा कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सचिव व कवठी गावचे पोलीस पाटील विठ्ठल राणे यांचे ते वडील होत.