रत्नागिरी | प्रतिनिधी
गेल्या मंगळवारपासून ( दि.20 मे ) चालू असलेल्या सततच्या पावसामुळे खेड, मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा बाधित झाला होता. महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत या तीनही तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
मंडणगड तालुक्यातील 33 केव्ही केरिल वाहिनीवर 20 मे रोजी सायंकाळी सहा दरम्यान तुळशी गाव परिसरात वीज पडली. यामुळे ही वाहिनी बंद पडली याचबरोबर याचा परिणाम 33 केव्ही केरील उपकेंद्रावर झाला. मात्र महावितरण यंत्रणेने आधीच उभ्या केलेल्या पर्यायी यंत्रणेमुळे या वाहिनी वरील ग्राहकांचा वीज पुरवठा काही तासातच सुरळीत करण्यात आला.
परंतु बाधित वाहिनी पुन्हा सुरु करण्यास एकूण 43 इन्सुलिटर्स बदलावे लागले. तुळशी गाव , देव्हारे, बाणकोट या परिसरातील जंगलातून ही वाहिनी येत असल्यामुळे हे काम अत्यंत जिकिरीचे व आव्हानात्मक होते. 33 केव्ही वीज वाहिनीवर काम करण्यासाठी कमीत कमी आठ ते नऊ कामगारांचा संच लागतो व सर्व प्रकारचे साहित्य बरोबर असावे लागते. ही सर्व तयारी स्थानिक अधिकाऱ्यांनी आधीच करून ठेवली होती.
माननीय मुख्य अभियंता अनिल डोये, माननीय प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई व कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व तांत्रिक कर्मचारी / सहकारी व सूचीबद्ध कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांना यश आले व दिनांक 22 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही बाधित वाहिनी पूर्णतः पूर्ववत करण्यात आली.
मान्सूनच्या सुरवातीच्या पावसात व परतीच्या पावसात आकाशात विजेचा खूप कडकडात होतो. ही आकाशातील वीज , वीज यंत्रणेकडे आकृष्ट होत असते. त्यामुळे भर पावसात काम करणे आव्हानात्मक असते. कधी कधी हे काम जीवावर बेतू शकते. परंतु अशा प्रकारच्या संकटाना महावितरण कर्मचारी जिद्दीने व चिकाटीने तोंड देत असतात. अशा प्रसंगी वीज ग्राहकांनी सहकार्य करावे अशी भावना वीज कर्मचाऱ्यांची असते.
