पिंगुळी काळेपाणी येथे झाली १ लाख १६ हजार रुपयाची चोरी…
कुडाळ | प्रतिनिधी
पिंगुळी काळे पाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांचे बंद घर फोडून घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तानावडे कुटुंबीय काल (शुक्रवारी) घर बंद करून मुंबईला गेले होते. १ लाख १६ हजार रुपयांची ही चोरी झाली आहे. यामध्ये रोख रक्कम सोने व चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत गेल्या पाच दिवसात ही दुसरी घरफोडी त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्याने आव्हान निर्माण केले आहे.
कुडाळ येथील नाबरवाडी येथे रुद्रे यांच्या घरफोडीचे प्रकरण ताजे असतानाच आता पिंगुळी काळे पाणी येते घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. पिंगुळी काळे पाणी येथील सुरेखा तानावडे व त्यांचे कुटुंबीय एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबई येथे काल (शुक्रवारी) जनशताब्दी या गाडीने गेले घर बंद करून हे कुटुंबीय गेले होते. दरम्यान आज (शनिवारी) सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांना घराचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत दिसून आला म्हणून त्यांचे नातेवाईक पिंगुळी सद्गुरु नगर येथे राहणारे नंदन विश्वनाथ गोवेकर यांना शेजाऱ्यांनी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सुरेखा तानावडे यांच्या मुलाला फोन लावून तुम्ही कुणाला घराची चावी दिली होती का? अशी विचारणा केली त्यावेळी त्यांनी नाही म्हणून सांगितल्यावर पडताळणी करण्यासाठी ते सुरेखा तानावडे यांच्या घरी आले. त्यानंतर घरातील कपाट तोडलेले होते. त्यांनी याबाबतची माहिती सुरेखा तानावडे यांना देऊन तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत खबर दिली. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटे उघडून त्यातील रोख रक्कम ४० हजार, २४ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, २४ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १० हजार रुपये किमतीची चांदीची ताट व वाटी असे मिळून १ लाख १६ हजार रुपये किमतीची चोरी झाल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी आढाव, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी भेट दिली तसेच ठसे तज्ञ व श्वान पथक दाखल झाले होते गेल्या पाच दिवसात ही दुसरी घरफोडी असल्यामुळे पोलिसांसमोर चोरट्याने आव्हान निर्माण केले आहे.
