सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
देवगड तालुक्यात नारिंग्रे येथे बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक प्रवासी बचावला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यात नारिंगरे इथं दुपारच्या सुमारास ही घटना घडली. देवगड तालुक्यातील नारिंगरे मार्गावर भरधाव ऑटो रिक्षाने एसटी महामंडळाच्या बसला समोरून धडक दिली. विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंग्रे इथं आली असता समोरून येणाऱ्या रिक्षा चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर रिक्षा हा थेट एसटी बसवर धडकला.
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात रिक्षाचा चकाच्चूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात घटनास्थळावर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरूप बचावला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चौघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
या अपघातात संकेत सदानंद कदम (३५), आचरा वरचीवाडी, संतोष रामजी गावकर (३५), आचरा गाऊडवाडी, रोहन मोहन नाईक (३५), आचरा गाऊडवाडी, सोनू,सूर्यकांत कोळबकर (४५)आचरा पिरावाडी यांचा मृत्यू झाला तर रघुनाथ बिनसाळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचाराकरिता गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.