Friday, July 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळमहायुती सरकार दशावतार कलावंतांना राजाश्रय देणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

महायुती सरकार दशावतार कलावंतांना राजाश्रय देणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

आमदार निलेश राणे दशावतार कलावंतांसाठी करीत आहेत प्रयत्न

 

कुडाळ येथे माझा लोकराजा महोत्सव झाला संपन्न

 

कुडाळ | प्रतिनिधी

दशावतार कलावंतांनी पारंपारिक जी कला आहे ती कुठे लयास जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगून महायुतीच्या माध्यमातून आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून दशावतार लोककलेला राजाश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी लवकरच जिल्ह्यातील सर्व दशावतार कलावंतांचा मेळावा कुडाळ येथे घेतला जाईल असे त्यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या माझा लोकराजा महोत्सवात सांगितले.

 

कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलावंत बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात माझा लोकराजा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, पणदूर हायस्कूलचे शिक्षक अविनाश वालावलकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर, अँड पी. डी. देसाई, प्रेमानंद देसाई, अँड. सोनू गवस, सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर, केरवडे उपसरपंच अर्जुन परब, दिलीप सावंत, दशावतार कलाकार पपू नांदोसकर, दत्तप्रसाद शेणई, दिनेश शिंदे, स्वरूप वाळके, सिद्धेश कलिंगण, पखवाज वादक महेश सावंत, विनायक घाडी व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की ही कला जिवंत राहिली पाहिजे काही काळ या कलेने वाईट दिवस पाहिले आहेत पण आता पुन्हा एकदा या कलेला बहर आला आहे नवे कलाकार यामध्ये येत आहेत. पण या कलावंतांनी जी पारंपारिक दशावतार कला आहे ती जोपासली पाहिजे ट्रिकसिन किंवा इतर गोष्टी करायला विरोध नाही पण जो पारंपारिक कलेचा गाभा आहे तो लयास जाऊ देऊ नये आता तर महायुतीचे सरकार आहे यामध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे दशावतार कलावंतांवर कोणताही अन्याय होणार नाही असे सांगून आपला विषय आमदार निलेश राणे यांनी हाती घेतला आहे. तो विषय पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही यासंदर्भात त्यांनी सांस्कृतिक कला मंत्रालयाचे मंत्री आशिष शेलार यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे आशिष शेलार सुद्धा या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निश्चित या कलेला राजाश्रय मिळाल्याशिवाय राहणार नाही. दशावतार कलावंतांनी कोणाच्या सांगण्यावरून काही गोष्टी करू नये. कलावंतांचे हित ज्यामध्ये आहे ते त्यांनी पाहिले पाहिजे. येत्या काही दिवसांमध्ये कुडाळ येथे सर्व जिल्ह्यातील दशावतार कलावंतांचा मेळावा घेतला जाईल. या मेळाव्यामध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह संस्कृतिक कला विभागाचे मंत्री आशिष शेलार सुद्धा उपस्थित राहतील आणि त्यावेळी कलावंतांच्या ज्या व्यथा आहेत त्या त्यांच्यासमोर मांडल्या जातील. आपल्या कलावंतांना निश्चित न्याय मिळेल अशी मला खात्री आहे असे त्यांनी या कार्यक्रमाविषयी सांगितले.

 

यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार स्व. महादेव लोट व दशावतारातील ज्येष्ठ पखवाज वादक स्व. अशोक नेरुरकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार तसेच दशावतारातील ज्येष्ठ कलाकार सुरेश धुरी ( माणगाव ), ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रकाश आकेरकर (आवेरे ) व ज्येष्ठ कलाकार पंढरीनाथ सामंत (आंदूर्ले) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी -बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांच्या संचात रक्तपिसासू रक्ताक्षी नाटक सादर करण्यात आले. सूत्रसंचालन हरेश नेमळेकर,सन्मानपत्र वाचन मोरेश्वर सावंत, तर आभार विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!