देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर मध्यरात्री गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत सुमारे २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयितांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. देवगड परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार कुणकेश्वर ब्राह्मणदेव मंदिर परिसरात दोन दुचाकींवर चार संशयित थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पथकाने त्यांना शिताफीने पकडले. मिलिंद महादेव कुबल (५६, रा. आनंदवाडी-देवगड), मनोज वसंत जाधव (५०, रा. देवगड किल्ला-देवगड), सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (२५, रा. तारकर्ली काळेथर-मालवण), गौरव विनोद पाटकर (२२, रा. वायरी आडवण) अशी संशयितची नावे आहेत.
त्यांच्या झडतीत ९५ ग्रॅम गांजा (किंमत ३ हजार रुपये) तसेच ७० हजार रुपयांच्या प्रत्येकी अशा दोन दुचाकी मिळून एकूण २ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपींकडून हा गांजा मालवणमधील सिद्धेश मयेकर व गौरव पाटकर यांना देण्यासाठी आणल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, विल्सन डिसोझा, प्रकाश कदम, आशिष जमादार, महेश्वर समजीस्कर यांचा समावेश होता. या घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार आशिष जमादार यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.


