रुग्णालयाच्या जागेत अनधिकृत उभारले हॉटेल
कुडाळ | प्रतिनिधी
शहरातील राजमाता जिजाऊ चौकासमोर असलेल्या रुग्णालयाच्या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल व्यवसाय थाटणाऱ्या हॉटेल रुचकरच्या मालकाला रुग्णालय प्रशासनाकडून हे हॉटेल स्वखर्चाने सात दिवसांच्या आत काढण्याची नोटीस बजावण्यात आली आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी हा हॉटेल व्यवसाय राजकीय वरदहस्तामुळे सुरू होता.
शहरातील राजमाता जिजाऊ चौकासमोरील माठेवाडा येथे जिल्हा रुग्णालयाची जागा आहे या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू आहे दरम्यान दोन महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालयाने रुग्णालयाच्या जागेची मोजणी केली या मोजणी क्षेत्रांमध्ये असलेली जागा निश्चित झाल्यानंतर या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल उभारल्याचे निष्पन्न झाले गेले अनेक वर्ष राजकीय वरदहस्थामुळे हे हॉटेल सुरू होते दरम्यान जिल्हा रुग्णालयाने जागा निश्चित झाल्यानंतर आपली हद्द सिमेंटचे खांब उभारून निश्चित केली आता रुग्णालयाच्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय अनधिकृत थाटल्याचे उघड झाले आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने हॉटेल रुचकरच्या मालकाला हे हॉटेल सात दिवसाच्या आत काढण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावल्याचे पुरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वाळके यांनी सांगितले.
पेडणेकर कुटुंबीयांना आले होते हटविण्यात
कविलकाटे येथील पेडणेकर कुटुंबीय हे हॉटेल होण्यापूर्वी चहाचा स्टॉल त्याठिकाणी चालवत होते मात्र राजकीय दबाव टाकून या गरीब पेडणेकर कुटुंबीयांना त्यांच्या चहाच्या स्टॉलसह हटवून पक्के बांधकाम करण्यात आले आणि त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आला होता.


