हिंदू बांधवही सहभागी सर्वधर्मसमभावाचे एकोप्याचे घडवले दर्शन
ओरोस25
सिंधुदुर्गनगरी येथील ख्रिश्चनवाडी ओरोस येथे पारंपरिक उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र ‘सांजावं’ सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ख्रिस्ती बांधवांच्या या आनंदोत्सवात स्थानिक हिंदू बांधवांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा एक अनोखा व आदर्श संदेश दिला.
’सांजावं’ (São João) हा सण दरवर्षी जून महिन्यात, पावसाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मशास्त्रातील कथेनुसार, हा दिवस ‘सेंट जॉन द बॅप्टिस्ट’ (St. John the Baptist) यांच्या जन्माप्रीत्यर्थ साजरा केला जातो. सेंट जॉन हे येशू ख्रिस्तांना बाप्तिस्मा (दीक्षा) देणारे संत मानले जातात. जेव्हा ते त्यांच्या मातेच्या गर्भात होते, तेव्हा येशूच्या आगमनाने त्यांनी आनंदाने उडी मारली होती, असे मानले जाते. त्याचेच प्रतीक म्हणून या दिवशी तरुण, लहान-मोठे बांधव विहिरीत किंवा पाण्याच्या प्रवाहात आनंदाने उड्या मारतात. तसेच पावसाळ्यात निसर्गात फुललेल्या रंगीबेरंगी फुलांचा आणि पानांचा मुकुट (ज्याला ‘कोपेल’ म्हटले जाते) डोक्यावर परिधान करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ख्रिश्चनवाडी ओरोस येथील या सोहळ्याचे रूप यंदा अधिकच देखणे आणि कौतुकास्पद ठरले. ख्रिस्ती बांधवांच्या या आनंदात गावातील हिंदू बांधव सामील झाले होते. एकमेकांना ‘सांजावं’ सणाच्या शुभेच्छा देत, पारंपरिक गजर आणि संगीताच्या तालावर सर्वांनी एकत्र ठेका धरला. “सण कोणत्याही धर्माचा असो, आनंद एकत्र साजरा करण्यातच खरा मोठेपणा आहे,” अशी भावना यावेळी समाजातील नागरिकांनी व्यक्त केली. ओरोसच्या या सलोख्याने संपूर्ण जिल्ह्यासमोर एकतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे.
‘फादर मेल्वीन फेराव’ यांनी प्रभू येशूकडे सर्वांसाठी मंगल कामाना करताना गावातील हा सामाजिक सलोखा असाच सदैव रहावा अशी प्रार्थना केली. यावेळी ओरोस तसेच रानबांबूळी गावातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
”पावसाच्या नवचैतन्यात साजरा होणारा हा सण रानबांबूळी व ओरोसकरांनी एकत्र येऊन अधिकच रंजक बनवला. डोक्यावर फुलांचे मुकुट, पारंपरिक गाणी आणि सर्वधर्मीय बांधवांचा एकमेकांना दिलेल्या आलिंगणाचा विळखा. हे चित्र ओरोसच्या संस्कृतीची खरी ओळख करून देणारे होते!”


