साळगाव :
आषाढी एकादशीच्या पवित्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा साळगाव नं 2 घाटकरनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात बाल दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीत लहान मुलांनी वारकरी वेश परिधान करून सहभाग घेतला होता.
दिंडीचे आकर्षण विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशातील दोन विद्यार्थी ठरत होते.पालखी, हातात भगवे झेंडे, डोक्यावर माळा, गळ्यात तुळशीच्या माळा आणि पारंपरिक पेहराव परिधान केलेल्या मुलांनी टाळांच्या गजरात”ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष करत गावातून दिंडी काढली. शिक्षिका सौ पिळणकर मॅडम,सौ बांदिवडेकर मॅडम यांनी दिंडीचे नेतृत्व केले.विठ्ठल रखुमाईच्या गजरात साळगांव दुमदुमले होते.
दिंडी साळगाव येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे पोहोचली.तेथे सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन भजन केले व हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला. लहानपणापासूनच मुलांमध्ये वारकरी संस्कृती आणि धार्मिक मूल्य रुजावेत व हरिनामाची आवड निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश होता.
शाळेच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी आणि पालकांनी कौतुक केले. हिरवळीने नटलेल्या परिसरातून निघालेल्या या बाल दिंडीने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले होते.मुलांची वेशभूषा, रंगभूषा दशावतार कलाकार संदेश कर्पे यांनी केली तर शिक्षिका पिळणकर मॅडम व बांदिवडेकर मॅडम यांनी सहकार्य केले.
यावेळी दिंडी सोबत अंगणवाडी मदतनीस सौ अमृता कोरगावकर,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ शुभ्रा कोरगावकर,सौ नाईक, सौ स्वाती कोरगावकर,सौ माळकर,सौ करुणा कोरगावकर,सौ गायचोर,सौ घाटकर,श्री बाबा गायचोर,श्री संतोष कोरगांवकर उपस्थित होते.


