Friday, August 14, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीनशामुक्त सिंधुदुर्ग प्राधान्याने हाती घ्या - पालकमंत्री नितेश राणे*

नशामुक्त सिंधुदुर्ग प्राधान्याने हाती घ्या – पालकमंत्री नितेश राणे*

‘नशामुक्त शालेय परिसर’ कार्यक्रमाने जिल्ह्यात अभियानाचा प्रारंभ; १३४ शाळांचा सहभाग

 

सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) :

नशामुक्त सिंधुदुर्ग हे प्राधान्याने हाती घेऊन अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घ्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोस येथे पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘नशामुक्त शालेय परिसर’ कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

 

कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित होते. वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील १३४ शाळांनी सहभाग नोंदविला.

 

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, युवक ही जिल्ह्याची खरी संपत्ती असून त्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अमली पदार्थांची पुरवठा साखळी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. मटका, जुगार, ड्रग्ज यांसह समाजघातक प्रवृत्तींना जिल्ह्यात थारा मिळता कामा नये. नशामुक्त जिल्हा हे आपले प्राधान्याचे काम असून सर्वांनी प्रामाणिकपणे या अभियानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

 

खासदार नारायण राणे यांनी अभियानाचे कौतुक करत पालकांनी नशामुक्तीचे महत्त्व मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन केले. मोबाईलपासून अनेक व्यसनांची सुरुवात होऊ शकते. विद्यार्थ्यांनी जीवनाचे उद्दिष्ट निश्चित करून नशेपासून दूर राहावे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज व्यक्त केली. तरुणांची ताकद सकारात्मक आणि विधायक कार्यासाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी प्रास्ताविकात व्यसनाधीनता नकळत कुटुंब उद्ध्वस्त करणारी समस्या असल्याचे सांगितले. मागील वर्षी नशामुक्ती अभियानांतर्गत सुमारे ५० कार्यक्रमांमध्ये १४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा शाळांमधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘पोलीस दूत’ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे असे सांगितले. यावेळी जनजागृतीपर ‘ड्रगला नाही म्हणू’ या लघुपटाचे सादरीकरण करून ‘पोलीस दूत’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी आभार मानले.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!