स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार; भाजप युवा मोर्चा कुडाळकडून महायुती सरकार व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून, शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ या नामांकित हॉटेल समूहाचे हॉटेल साकारत आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुडाळच्या वतीने महायुती सरकार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’सारख्या प्रतिष्ठित हॉटेल समूहाचा प्रकल्प उभारला जाणे हे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रासाठी निश्चितच महत्त्वाचे पाऊल असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे केवळ पर्यटन वाढणार नसून हॉटेल व्यवसायासोबतच वाहतूक, स्थानिक सेवा, खाद्यपदार्थ, हस्तकला आणि इतर पूरक व्यवसायांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः जिल्ह्यातील युवकांना आपल्या गाव-जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने हा प्रकल्प युवकांसाठी आशादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे आभार व्यक्त करताना भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा, पर्यटन क्षेत्राचा विस्तार व्हावा आणि सिंधुदुर्गमध्ये आणखी मोठे उद्योग व पर्यटन प्रकल्प यावेत, यासाठी पालकमंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
“सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणाऱ्या अशा प्रकल्पांचे आम्ही स्वागत करतो. स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणे ही या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे भाजप युवा मोर्चा कुडाळच्या वतीने मनःपूर्वक आभार,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, युवा मोर्चा कुडाळ मंडल अध्यक्ष तन्मय वालावलकर, ओरोस मंडल अध्यक्ष शुभम परब, युवा मोर्चा कुडाळ मंडल उपाध्यक्ष वैभव पवार, रजत चव्हाण, लक्ष्मीकांत राणे, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, ओंकार म्हात्रे, व्यंकटेश परब, अक्षय तेंडुलकर, कुडाळ शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, विजय कांबळी, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील आदी उपस्थित होते.


