Monday, August 24, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*ओरोसमध्ये 'गुरुकुल अकॅडमी'च्या नूतन वास्तूचे शानदार उद्घाटन; "यश मिळेपर्यंत थांबू नका!" -...

*ओरोसमध्ये ‘गुरुकुल अकॅडमी’च्या नूतन वास्तूचे शानदार उद्घाटन; “यश मिळेपर्यंत थांबू नका!” – दयानंद कुबल यांचा युवकांना कानमंत्र* 

ओरोस (प्रतिनिधी):

गेली १४ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांची व्यापक चळवळ राबवणाऱ्या ‘गुरुकुल अकॅडमी’च्या स्वमालकीच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा नुकताच ओरोस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. “परिस्थितीला दोष न देता, मेहनतीला सातत्याची जोड द्या आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका,” असा प्रेरणादायी मंत्र यावेळी प्रमुख वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी उपस्थित युवकांना दिला.

         ‘गुरुकुल अकॅडमी’ गेली १४ वर्षे जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांबाबत सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत आहे. या दर्जेदार मार्गदर्शनातून आजवर शेकडो विद्यार्थी पोलीस दल आणि विविध प्रशासकीय सेवांमध्ये यशस्वीरीत्या दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांचे स्वप्न दाखवणाऱ्या प्रा. सुनील धोणुकसे , श्रद्धा धोणुकसे या दाम्पत्याच्या आणि गुरुकुल 

परिवाराच्या गेल्या चार वर्षांच्या अथक परिश्रमातून ही भव्य वास्तू अखेर उभी राहिली आहे.

       नव्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तयारीसाठी सर्व अद्ययावत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोठ्या शहरात मिळणाऱ्या सुविधा आता सिंधुदुर्गातच उपलब्ध झाल्याने, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच ठरली आहे.

 लेखी परीक्षेचे दर्जेदार मार्गदर्शन आणि मैदानी प्रशिक्षण , विद्यार्थ्यांसाठी आरामदायी हॉस्टेल आणि उत्तम मेसची (भोजन) सुविधा, अभ्यासासाठी पोषक, शिस्तबद्ध आणि शांत वातावरण असलेली अभ्यासिका.

       या वास्तूचे उद्घाटन प्रा. सुनील धोणुकसे यांच्या मातोश्री सौ. सुशीला धोणुकसे आणि वडील श्री. गणपती धोणुकसे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना अकॅडमीच्या प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली ती पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर दीप प्रज्वलन , सरस्वती पुजारी आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 

       गुरुकुल परिवाराकडून गुरूकुलची वास्तू उभी करताना ज्या ज्या व्यक्तींनी आर्थिक , शारीरिक मानसिक मदत केली त्या सार्‍यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

 

दयानंद कुबल: “सिंधुदुर्गच्या लाल मातीत इतिहास घडविण्याची ताकद आहे. विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेऊन प्रशासकीय सेवेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.”

 

पद्मश्री परशुराम गंगावणे: “शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे. मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.”

 

उपस्थित मान्यवर

या दिमाखदार सोहळ्याला संविता आश्रमचे संचालक संदीप परब, जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर, छोटू पारकर, क्रीडा कोच संकेत कदम, योगेश तावडे यांच्यासह अनेक मान्यवर, आजी- माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकॅडमीचे प्राचार्य बी. एस. जांभेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. सुनील धोणुकसे यांनी मानले.

‘गुरुकुल’ची ही नवी वास्तू केवळ एक इमारत नसून, भविष्यात सिंधुदुर्गच्या मातीतून अनेक प्रशासकीय अधिकारी घडवणारे ‘यशाचे गुरुकुल’ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!