Monday, August 24, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा

जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन

 

*सिंधुदुर्गनगरी, दि. २४* 

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी निगडित महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा व भावनांचा आदर राखत सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी हॉल येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, ध्वनिप्रदूषण तसेच सामाजिक सलोखा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह पोलीस, वाहतूक, राज्य परिवहन विभाग आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते. 

 

दोन्ही धर्मांचे सण जवळच्या कालावधीत येत असल्याने एकमेकांच्या श्रद्धांचा सन्मान राखून सण साजरे करावेत. सणांच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. कोणताही वाद उद्भवू नये यासाठी दोन्ही समाजातील प्रमुखांनी एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहावे, असे डॉ. दहिकर यांनी सांगितले.

 

मिरवणुकीचे मार्ग आगाऊ निश्चित करून त्यासाठी प्रशासनाची आवश्यक परवानगी घ्यावी. मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे, स्पीकर आदींसाठी निर्धारित वेळ व ध्वनिमर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे, आक्षेपार्ह बॅनर-पोस्टर किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

 

सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी. अफवा किंवा आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तो प्रसारित न करता तत्काळ पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावा. कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल, वादाची शक्यता किंवा अनुचित घटना निदर्शनास आल्यास पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असेही डॉ. दहिकर यांनी स्पष्ट केले.

 

निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुकटे यांनी गणेश मंडळे, शांतता समितीचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी समन्वय ठेवून मिरवणुकीच्या वेळा, मार्ग आणि नियोजनाची माहिती प्रशासनाला द्यावी. सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे सांगितले.

 

सर्व धर्मांच्या श्रद्धा, परंपरा आणि सणांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणत्याही धर्माबाबत अवमानकारक टिप्पणी करणे टाळावे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्व धार्मिक व सामाजिक घटकांनी संवाद वाढवावा आणि अफवा अथवा गैरसमजामुळे वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी अशासकीय सदस्यांनी सहभागी होऊन जिल्ह्यातील सीसीटीव्ही, रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी आदी विषयांवर चर्चा केली. 

 

००००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!