Saturday, September 5, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी'सम्राट क्लब सावंतवाडी टाउन' ची स्थापना

‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ ची स्थापना

कला, संस्कृती व शिक्षणाच्या संवर्धनासाठी नव्या पर्वाची सुरुवात 

 

सावंतवाडी :

शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत असून ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ या नव्या क्लबचा स्थापना व पदग्रहण सोहळा रविवार ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता, राणी पार्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृह, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मये यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या क्लबची स्थापना होत आहे. चार्टर्ड प्रेसिडेंट सम्राट नरेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ चा प्रवास सुरू होत आहे अशी माहिती सम्राट क्लब मये अध्यक्ष सम्राट नरेश पेडणेकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

ते म्हणाले, ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’च्या चार्टड प्रेसिडेंटपदी सम्राट नरेंद्र देशपांडे यांची तर भावी अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पृथ्वीराज प्रताप, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार सुनिल राऊळ, संचालक स्मिता केंकरे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, जनसंपर्क अधिकारी दादा मडकईकर, ऑडीटर कौस्तुभ पेडणेकर, प्रोग्राम डायरेक्टर ॲड. सिद्धी परब, संचालकपदी डॉ. सोनल लेले, गुरुप्रसाद चिटणीस यांची निवड करण्यात आली आहे. कला, संस्कृती आणि शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून विविध विधायक उपक्रम राबविण्याचा क्लबचा मानस आहे. स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देणे, या उद्दिष्टांसाठी क्लब कार्यरत राहणार आहे. या स्थापना सोहळ्यास सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत सावंत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सम्राट धर्मा व्ही. चोडणकर, इन्स्टॉलेशन ऑफिसर व डायरेक्टर क्लब एक्स्टेंशन, सम्राट क्लब इंटरनॅशनल, तसेच सम्राट शशिकांत पुनाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ च्या स्थापनेमुळे सावंतवाडीच्या कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला एक संघटित व सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध होणार असून या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विधायक उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नव्या क्लबच्या स्थापना सोहळ्यास सम्राट परिवारातील सर्व कलाकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सम्राट क्लब मये अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष अर्जून नाईक, नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, गुरुप्रसाद चिटणीस आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!