कुडाळ शहरातील २४३ पथविक्रेते बजावणार मतदानाचा अधिकार
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक उद्या मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी कुडाळ नगरपंचायत येते होणार आहे. दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये एकूण सदस्य संख्या आठ असून यामधील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत तर एका जागेवर नामनिर्देशन दाखल झालेले नाही त्यामुळे दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये २४३ पथविक्रेते मतदानाचा अधिकार बजावणार आहे.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगर पथ विक्रेता सदस्य समिती स्थापन करण्याबाबत शासनाकडून निर्देश आले असून ही समिती स्थापन करताना पथ विक्रेत्यांमधील व्यावसायिक या समिती सदस्य असणे आवश्यक आहे त्यासाठी शासनाकडून निवडणूक लावण्यात आली होती या निवडणुकीमध्ये आरक्षण सोडत झाल्यानंतर कुडाळ नगरपंचायती मधील आठ जागांसाठी भाजप व महाविकास आघाडी कडून उमेदवार देण्यात आले होते यामध्ये भाजपचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला या आरक्षणामधील उमेदवार बिनविरोध झाले तर महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीमधील इतर मागास वर्ग महिला या आरक्षणावरील जागेवर कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे ही जागा रिक्त राहिली आहे. दरम्यान दोन सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक होणार आहे या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीची कुडाळ नगरपंचायतीने तयारी केली असून उद्या मंगळवार ३ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
