कुडाळ | प्रतिनिधी
एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्पांतर्गत सिंधुकन्या प्रभागसंघ, पिंगुळी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उमेद मार्ट विक्री व संकलन केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, आंब्रड पंचायत समिती सदस्य श्री. बाळकृष्ण मडव, पिंगुळी पंचायत समिती सदस्या सौ. ममता राऊळ, पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच श्री. अजय आकेरकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. गणेश राठोड, प्रभाग समन्वयक सौ. सुप्रिया वालावलकर, प्रभागसंघ पदाधिकारी, सर्व ग्रामसंघ पदाधिकारी सोनल वाक्कर तसेच प्रभागातील सर्व ग्रामसखी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही उमेद मार्ट साठी सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उमेद मार्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून, महिलांच्या उत्पादनांना योग्य दर व व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळून त्यांच्या उद्योगशीलतेला नवी दिशा मिळणार आहे.
उमेद मार्टमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेली विविध घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, लाडू, विविध प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने तसेच हस्तकला वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देत “महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ, महिलांना आर्थिक स्वावलंबन” हा उद्देश साध्य करण्यासाठी उमेद मार्ट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


