Thursday, September 24, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीजिल्ह्यात आंबा व काजू पीक नुकसान भरपाई निधी वितरणाला गती

जिल्ह्यात आंबा व काजू पीक नुकसान भरपाई निधी वितरणाला गती

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक निधी देवगड तालुक्यासाठी मंजूर

 

सिंधुदुर्ग, दि. २४ (जिमाका) 

देवगड तालुक्यात आंबा व काजू पीक नुकसान भरपाईचे २० टक्केही काम झाले नसल्याचा दावा सोशल मीडियातून केला जात आहे. मात्र, दि. २५ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर नुकसान भरपाईच्या वितरणाची दि. २४ सप्टेंबर २०२६ अखेरची अधिकृत आकडेवारी पाहता, देवगड तालुक्यातील ५ हजार ९८२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर १४ कोटी २१ लाख ५४ हजार २६ रुपये नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. त्यामुळे निधी वितरित झालेला नाही, असा दावा वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे स्पष्ट होते.

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, देवगड तालुक्यातील ९ हजार ६४ मंजूर लाभार्थ्यांसाठी २० कोटी ७७ लाख १ हजार ८१६ रुपये निधी मंजूर आहे. त्यापैकी ५ हजार ९८२ लाभार्थ्यांना १४ कोटी २१ लाख ५४ हजार २६ रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच १ हजार ३२७ लाभार्थ्यांसाठी २ कोटी ७५ लाख ७४ हजार ३७५ रुपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे वितरित होणे बाकी आहे. संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया पुढे होणार आहे.

देवगड तालुक्यातील उर्वरित प्रलंबित प्रकरणांमध्ये ई-केवायसी तसेच बँक खाते व आधारशी संबंधित बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नुकसान भरपाईचे वितरण ई-पंचनामा पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रियेद्वारे संबंधित तहसील स्तरावरून सुरू आहे. लाभार्थ्यांनी आपला व्हीके क्रमांक घेऊन जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच शेतकरी आणि नागरिक यांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये, तसेच कोणीही चुकीच्या बातम्यांही प्रसारित करु नये, प्रशासनाने दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. 

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता, ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकूण ७९ कोटी ३४ लाख ५६ हजार ६७७ रुपये अपेक्षित निधी निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ई-पंचनामा पोर्टलवर ३४ हजार ९३३ लाभार्थ्यांसाठी ७६ कोटी ६ लाख ८० हजार १०१.७४ रुपये मंजूर झाले आहेत. दि. २४ सप्टेंबर २०२६ अखेर २६ हजार ६१२ लाभार्थ्यांना ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये नुकसान भरपाई वितरित झाली आहे. 

सध्या जिल्ह्यातील २ हजार ७०८ लाभार्थ्यांची ५ कोटी ४३ लाख ३९ हजार ४९१.७४ रुपये रक्कम ई-केवायसी प्रलंबित असल्याने थांबलेली आहे. जिल्ह्यातील ई-केवायसी आणि बँक खात्याशी संबंधित बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय निधी वितरण

मंजूर निधीच्या रकमेनुसार देवगड तालुक्यासाठी सर्वाधिक २० कोटी ७७ लाख रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १४ कोटी २१ लाख रुपये निधी वितरित झाला आहे. त्यानंतर कुडाळ तालुक्यात मंजूर १२ कोटी २५ लाख ७५ हजार ७२५ रुपयांपैकी १० कोटी ९२ लाख ७० हजार २७५ रुपये निधी वितरित झाला आहे. मालवण तालुक्यात मंजूर १० कोटी २९ लाख ८१ हजार २८३ रुपयांपैकी ७ कोटी ५० लाख १४ हजार ५४८ रुपये, तर सावंतवाडी तालुक्यात मंजूर ९ कोटी ८८ लाख २२ हजार ५१५ रुपयांपैकी ८ कोटी २८ लाख ५४ हजार ४१५ रुपये निधी वितरित झाला आहे.

वेंगुर्ला तालुक्यात मंजूर ६ कोटी ८७ लाख ६३ हजार ८३५ रुपयांपैकी ४ कोटी ७८ लाख ३५ हजार ६० रुपये, कणकवली तालुक्यात मंजूर ६ कोटी ५४ लाख ९१ हजार ६५० रुपयांपैकी ५ कोटी ८२ लाख ३३ हजार ७१८ रुपये, दोडामार्ग तालुक्यात मंजूर ५ कोटी ६७ लाख ६० हजार ७०० रुपयांपैकी ४ कोटी ४० लाख ६३ हजार ६७५ रुपये, तर वैभववाडी तालुक्यात मंजूर ३ कोटी ७५ लाख ८२ हजार ५७६ रुपयांपैकी ३ कोटी २९ लाख २० हजार २२६ रुपये निधी वितरित झाला आहे.

नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी संबंधित शेतकरी व लाभार्थ्यांनी तलाठी किंवा तहसील कार्यालयातून व्हीके क्रमांक प्राप्त करून जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ई-केवायसी पूर्ण करावी. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!