Friday, September 25, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीश्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा येथे २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान...

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा येथे २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; 29 सप्टेंबरला सम्राट क्लब इंटरनॅशनल सावंतवाडी टाऊन च्या “संगीत संध्या” चे आयोजन

सावंतवाडी | प्रतिनिधी:

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) च्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२६ ते रविवार, ०४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण उत्सवातील विविध उपक्रमांचा आणि धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मंडळाने जाहीर केलेल्या दैनंदिन कार्यक्रमांच्या रूपरेषेनुसार, उत्सवाच्या १३ व्या दिवशी (शनिवार, २६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सालईवाडा परिसरासाठी महिलांची वेशभूषा स्पर्धा आणि रात्री ८ वाजता भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. १४ व्या दिवशी (रविवार, २७ सप्टेंबर) सकाळी ९:३० वाजता १० वी पर्यंतच्या लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि रात्री ८ वाजता ‘घुमट आरती म्हापसा गोवा’ हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उत्सवाच्या १५ व्या दिवशी (सोमवार, २८ सप्टेंबर) सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत नाचणीपासून गोड व तिखट पदार्थ बनवण्याची पाककला स्पर्धा रंगणार असून, यासाठी इच्छुक महिलांनी महिला मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता श्रीपाद चोडणकर यांचा ‘संगीत रजनी’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. १६ व्या दिवशी (मंगळवार, २९ सप्टेंबर – अंगारकी संकष्टी) सायंकाळी ४ वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण आणि रात्री ८:३० वाजता सम्राट इंटरनॅशनल क्लब आयोजित ‘सम्राट संगीत संध्या २०२६’ हा कार्यक्रम पार पडेल. यामध्ये भक्ती संगीत, भावगीते आणि नाट्यसंगीताचा नजराणा पेश केला जाणार असून ‘सम्राट संगीत सितारा २०२६’चे विजेते हर्ष नकाशे यांच्यासह ॲड. सिद्धी परब, स्मिता केंकरे आणि कु. विधिता केंकरे गायन सादर करतील, तर आशुतोष चिटणीस व सौ. प्रतिभा चव्हाण सूत्रसंचालन सांभाळतील.

१७ व्या दिवशी (बुधवार, ३० सप्टेंबर) रात्री ९:३० वाजता Gen Z युवक-युवतींसाठी ‘फनी गेम विथ कपिल’चे आयोजन केले आहे. १८ व्या दिवशी (गुरुवार, ०१ ऑक्टोबर) दुपारी १ ते ३ या वेळेत श्री. राजाराम स्वार व कुटुंबीयांतर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाईल, तर रात्री ९:३० वाजता बादल चौधरी यांच्यासोबत रंगतदार ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम होईल.

१९ व्या दिवशी (शुक्रवार, ०२ ऑक्टोबर) सकाळी ८:३० वाजता स्वच्छता अभियान, सायंकाळी ४ वाजता सामूहिक मोदक अर्पण व हळदीकुंकू आणि रात्री ९:३० वाजता सालईवाड्यातील महिलांसाठी फुगडी स्पर्धा पार पडेल. २० व्या दिवशी (शनिवार, ०३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ आरती व महाप्रसाद आणि रात्री ९ वाजता श्री निलेश मेस्त्री आयोजित ‘सदगुरु संगीत कार्यक्रम’ रंगणार आहे.

शेवटी २१ व्या दिवशी (रविवार, ०४ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता आदिनारायण मंगल कार्यालय येथे अथर्वशीर्ष पठण होईल आणि सायंकाळी ६ वाजता महाआरतीनंतर बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!