कुडाळ | प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या अनुभवातून समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने कुडाळ नगरपंचायत, कुडाळ व ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम गुरुवार, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठा समाज हॉल, कुडाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवळकर, मुख्याधिकारी श्री. खंडू पवळ तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कुडाळचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाताडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा गौरव करताना, ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असून, त्यांच्या अनुभवातून पुढील पिढीला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, सुरक्षितता, आरोग्यविषयक सुविधा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभाग मिळणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवळकर यांनी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून, त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवातून पुढील पिढीला मोठी शिकवण मिळते, असे सांगितले. ज्येष्ठांना केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर प्रेम, आपुलकी, संवाद आणि सन्मानाची गरज असते. बदलत्या जीवनशैलीमध्ये ज्येष्ठांना एकटेपणा जाणवू नये, त्यांना विरंगुळा, संवाद आणि आनंदाचे क्षण मिळावेत, यासाठी कुटुंबासोबतच समाज आणि स्थानिक प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कारांचा सन्मान असून, त्यांच्या अनुभवाची शिदोरी ही पुढील पिढीसाठी अमूल्य ठेवा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. खंडू पवळ यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिक दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून, वर्षभर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आपण काय केले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवू शकलो का, याचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. ज्येष्ठांना संपत्ती किंवा भौतिक सुखांपेक्षा दोन प्रेमाचे शब्द, मायेची विचारपूस, संवाद आणि आपुलकी अधिक महत्त्वाची असते. आपल्या स्वतःच्या वडिलांशी दररोज साधला जाणारा संवाद हा त्यांच्या मनोगतातील भावनिक संदर्भ ठरला. काही मिनिटांचा संवादही नात्यांमध्ये आत्मीयता आणि आधाराची भावना निर्माण करतो, असे त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, कबीर, स्वामी विवेकानंद आणि अन्य विचारवंतांच्या विचारांचा संदर्भ देत मुख्याधिकारी यांनी ज्येष्ठांची सेवा ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवी मूल्यांची जपणूक असल्याचे अधोरेखित केले. “कामातून निवृत्त झालो म्हणजे आयुष्यातून निरुपयोगी झालो, असा विचार ज्येष्ठांच्या मनात निर्माण होता कामा नये. त्यांचा अनुभव हे समाजाचे अनुभवांचे ग्रंथालय आहे. त्यांच्या ज्ञानाचा, संस्कारांचा आणि अनुभवाचा लाभ पुढील पिढीला मिळाला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
“ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कारांचा सन्मान” या भावनेतून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा, यावरही भर देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या व भावना जाणून घेण्यासाठी नगरपंचायतीने त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला असल्याचे सांगून, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा, संवाद आणि आनंदाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र’ लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्याधिकारी श्री. खंडू पवळ यांनी केली. “आम्हाला केवळ कागदावर योजना ठेवायच्या नाहीत; तर प्रत्यक्ष कृतीतून ज्येष्ठांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्याठिकाणी आनंदाचे हास्य फुलवायचे आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्माननीय, सुरक्षित आणि आनंदी वातावरण निर्माण करणे ही कुटुंबासोबतच समाज आणि स्थानिक प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, कुडाळ नगरपंचायत ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही मुख्याधिकारी यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, कृतज्ञता, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला.


