कुडाळ | प्रतिनिधी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व संभाजी भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गामाता दौड ही एक धावण्याची दौड नसून तरुण पिढीमध्ये भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्म जागृती निर्माण करण्याचे एक माध्यम असून पदयात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची शौर्याची आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा उद्देश्य या दुर्गामाता दौडीचा आहे. यात महिलांसह पुरूष मंडळींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कुडाळ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहीती देण्यात आली. यावेळी उन्मेषा दाभोलकर, पद्मा वेंगुर्लेकर, श्वेता बेलेकर-सावंत, भावना वेळकर, बंड्या सावंत, श्रीकृष्ण शिरोडकर, रमाकांत नाईक, विवेक पंडित, शिवम म्हाडेश्वर, आनंद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
सोमवारी 19 रोजी सकाळी 8 दुर्गामाता दौडला आई केळबाई मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. नंतर कुडाळ बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जिजामाता चौक येथे दौडचा समारोप होणार आहे. यावेळी 16 कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. कणकवली बिडवाडी येथील महिलांचे लाठीकाठी, तलवारबाजी व दांडपट्टा प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर होणार असून, विविव उपक्रम घेण्यात येणार आहेत. या पदयात्रेत महिलांसह पुरूष मंडळींनी पारंपारिक वेशभुषेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


