Wednesday, October 14, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळपावशी-पिंगुळीतील सोनसाखळी चोरींचा छडा; ४७ वर्षीय संशयिताला अटक 

पावशी-पिंगुळीतील सोनसाखळी चोरींचा छडा; ४७ वर्षीय संशयिताला अटक 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई – रोकड, दुचाकी, हेल्मेट व स्प्रे जप्त

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 कुडाळ तालुक्यात पावशी आणि पिंगुळी येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटनांची उकल करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पद्मनाभ रामचंद्र कशाळेकर (वय ४७, रा. एमआयडीसी, वरची कुंभारवाडी, कुडाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, गुन्ह्यांत वापरल्याचा संशय असलेली सुमारे दीड लाख रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे आर-१६० दुचाकी, हेल्मेट आणि पेन रिलीफ स्प्रे जप्त करण्यात आला आहे.

   १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता पावशी-बेलनदीवाडी येथे अनिता अशोक अंधारी (वय ५०) या कुडाळला जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी एका अनोळखी इसमाने घावनळे मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा करत त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पळ काढला. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी पिंगुळी-सराफदारवाडी येथे एका वृद्ध महिलेच्या घरी जाऊन दरवाजा उघडताच तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणीही कुडाळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

    या दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी समांतर तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चोरट्याचे वर्णन, बोलीभाषा, वाहनाची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

     या तपासातून संशयिताची ओळख पटवून त्याला कुडाळ एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने पावशी आणि पिंगुळी येथील दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंगुळी येथील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार, अविनाश ओटवणेकर आणि अमर कांडर यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!