सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरवठा अधिकारी म्हणून आपण काम केले आहे. या जिल्ह्याची आपल्याला माहिती आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वय ठेवून सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करू. जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा अभ्यास करू, जर नद्या गाळाने भरलेल्या असतील तर त्या मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न करू असे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. या जिल्ह्यात आपण यापूर्वी म्हणजे सन ९७ – ९८ या काळात ११ महीने जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम केले होते. या जिल्ह्यात चांगले काम सर्वांच्या सहकार्याने करू असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पूर परिस्थिती व गाळाने भरलेल्या नद्या बाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले जर गाळणे नद्या भरलेल्या असतील तर त्या मोकळ्या करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. पूर परिस्थितीला हेच कारण असेल तर त्याचा आपण अभ्यास करून हा गाळ साफ करण्यासाठी जनतेच्या सहकार्याने तसा प्रयत्न करू असेही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
