सिंधुदुर्ग | वृत्तसेवा
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत प्रयत्नाने साकार झालेली आपली राज्यघटना म्हणजेच आपले संविधान आणी याच संविधानाने समाजातील मागास प्रवर्गसाठी त्यांच्या आर्थिक सामाजिक आणी राजकीय विकासासाठी दिलेल्या आरक्षणाबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष जाहीर निषेध करत आहे. मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला संविधानिक संरक्षण का दिले हा मुद्दा विचारात न घेता फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन, काँग्रेस सत्तेत आले तर आपण आरक्षण संपवू हे विधान करणे मुळात प्रगल्भ राजकीय बुद्धिमत्ता नसण्याचे लक्षण आहे. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
काँग्रेस आणी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर हे समीकरण मुळात न पटणारे आहे. कारण ज्या काँगेसने बाबासाहेबाना १९५० व १९५२ या दोन्ही वेळी निवडणुकीत पराभूत करून राजकीय षडयंत्र रचले, बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले हे मुळात जातीयवादी लक्षण होते. स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी बाबासाहेबांनी लागू केलेल्या हिंदू कोड बिलाला कडकडून विराध केला होता.एकंदरीतच समस्त हिंदू स्त्रियांचा समानतेचा गाभा असलेले आणी महिलांना चुल आणी मूल या चाकोरीतून बाहेर काढून समाज प्रवाहात आणण्यासाठी हिंदू कोड बिलाचा वाटा खूप मोठा आहे.आणी याचा विरोध करणारे देखील काँग्रेस नेतेच होते. तसेच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १६ जुन १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करून भारतीय संविधानाला आपल्या हव्या त्या पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात केलेले बदल यात प्रमुख्याने ३८ वे संशोधन हे न्याय व्यवस्थेवर वर्चस्व आणण्यासाठी व आपले पंतप्रधान पद कायम ठेवण्याच्या हेतूने केले गेलेलं ३९ वे संशोधन राज्यघटनेची केलेली क्रूर चेष्टा होती. एवढेच नाही तर ४० आणी ४१ व्या संशोधन बदल तरतूदीतून ४२ वे संशोधन लागू केले गेले. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे म्हणण्या ऐवजी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंदिरा असे म्हटले जाऊ लागले होते.इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत काँग्रेस कडून संविधानावर जेव्हढे हल्ले झाले तेवढे हल्ले गेली ७४ वर्षात एकदा देखील झाले नाही. आणी आज त्यांचा नातू देखील आरक्षणा विरोधात बोलून पुन्हा एकदा काँग्रेस कशी राज्यघटना आणी मागास प्रवर्गा विरोधी आहे हे दाखवून देत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सिंधुदुर्ग या वक्तव्याचा जाहीर निषेध करतेच आहे शिवाय या घटने बद्दल राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास रिपब्लिकन पक्ष रस्यावर उतरेल असा इशारा या पत्राद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी दिला आहे.
