वेंगुर्ला | प्रतिनिधी
वेंगुर्ले शहरात २०११ मध्ये झालेल्या राजकीय राड्यात संशयित असलेले माजी नगराध्यक्ष कै.वेंगुर्ले प्रसन्ना कुबल, तत्कालीन शिवसेने अशोक वेंगुर्लेकर, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक नाईक व शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांच्यासाहित २९ जणांची राडयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, तत्कालीन वेंगुर्ला पोलीस निरिक्षक विवेकानंद तुकाराम वाखारे यांनी सरकारतर्फे अशी फिर्याद नोंदविली होती की, तत्कालीन आमदार दिपक केसरकर यांनी दूरध्वनीवरुन असे कळविले की, तत्कालीन स्वाभिमानी संघटनेचे नेते नितेश राणे व इतर काँग्रेस कार्यकर्ते हे विलास गावडे यांच्या घरी गेलेले आहेत, म्हणून स्वतः वाखारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक जाधव व पोलीस अंमलदार घेऊन विलास गावडे यांच्या घराकडे गेले. परंतू तेथे काही आढळून आले नाही. रात्रौ ८.०० वाजण्याचे दरम्याने निरीक्षक वाखारे हे पूर्वीच्या काँग्रेस प्रचार कार्यालय जे दाभोली नाका येथे होते तेथे गेले. तेथे नितेश राणे व त्यांचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर उभे होते. परंतू काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर चौकामध्ये तत्कालीन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच विलास गावडे यांचेही कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते. त्यात तत्कालीन शिवसेनेचे अशोक वेंगुर्लेकर, आनंद वेंगुर्लेकर, राजू वालावलकर, दादा हुले, तसेच तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक नाईक, शहर अध्यक्ष सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष कै. प्रसन्ना कुबल, दिपक नाईक वगैरे २०० ते २५० कार्यकर्ते दाभोली नाका येथे हजर होते. ते जोरजोराने घोषणाबाजी व शिवीगाळ करीत होते. श्री. वाखारे यांनी सर्वांना शांत रहाण्याचे आवाहन केले. परंतू जमाव उग्र झाल्यामुळे सदरची बाब तत्कालीन पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग यांना कळवून नियंत्रण कक्षामार्फत पोलीस उप अधिक्षक जाधव यांच्या कानी घातली. दरम्यानच्या काळात पोलीस उप अधिक्षक जाधव हे तत्कालीन तहसिलदार वेंगुर्ले श्रीम. पाटील यांच्यासह हजर झाले. त्यांना वाखारे यांनी सविस्तर रिपोर्ट दिला. त्यानंतर जमावास वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) लागू असून जमावातील कोणीही कायदा हातात घेऊ नये व तेथून निघून जावे, असे सांगितले. परंतू जमावाची ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीस काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रत्युत्तर करीत होते. त्यामुळे तत्कालीन तहसिलदार, वेंगुर्ले श्रीम. पाटील यांनी सौम्यबळाचा वापर करुन जमावाला पांगवा, असे तोंडी आदेश दिले. पोलीस कारवाई करणार इतक्यात सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास जमावातून काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या दिशेने दगड फेकण्यास सुरुवात झाली. म्हणून वाखारे यांनी जमावास सौम्य लाठीमार करुन पळवून लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमावातील लोक हे वेंगुर्ले जुना एस. टी. स्टँड व बाजाराच्या दिशेने पळून गेले. वरील प्रकारामुळे पोलीसांनी सचिन वालावलकर, प्रसन्ना कुबल, दिपक नाईक, राजन कर्पे, स्नेहा कुबल, धर्मेंद्र हुले, अशोक वेंगुर्लेकर, राजन वालावलकर, आनंद वेंगुर्लेकर, अल्ताफ शेख, सुहास परब, नित्यानंद पाटील, जयेश दळवी, रशीद शेख, भगवान गावडे, संजय केरकर, अभिनय मांजरेकर, भोजनाथ गावडे, श्रीपाद तांडेल, किरण तोरसकर, सुभाष पराडकर, संदिप गावडे, पांडुरंग मालवणकर, भगवान बटवलकर, सुशील बांदेकर, गोरखनाथ आरोंदेकर, भानुदास कुबल, रामचंद्र आरोंदेकर व सचिन शेट्ये यांच्या विरोधात भा.द.वि. कलम १४३, १४७, १४९, ३३६ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा नोंदवून वेंगुर्ले फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला.
याकामी सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. झालेला पुरावा व युक्तीवाद याच्याआधारे न्यायालय या निष्कर्षापर्यंत आले की, आरोपींनी गुन्हा केलेला आहे, असा पुरावा न्यायालयासमोर न आल्यामुळे सर्व आरोपींची वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, डी. वाय. रायरीकर यांनी सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी व अॅड. प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले.
