सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही विधानसभा मतदार संघात वंचित आघाडीच्या वतीने उमेदवार रिंगणात उतरविणार ; जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर

0

कुडाळ | प्रतिनिधी 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही विधानसभा मतदार संघात वंचित आघाडीच्या वतीने उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत. तीन विधानसभेमध्ये प्रत्येकी दोन- दोन उमेदवारांच्या नावांची शिफारस पक्षाकडे पाठविण्यात आली आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात मुस्लिम, कुडाळ विधानसभा मतदार संघात ओबीसी तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघात बौध्द उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरविला जाणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी दिली.

कुडाळ येथील ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. महेश परूळेकर बोलत होते. यावेळी युवा आघाडीचे सागर जाधव, कुडाळ तालुका अध्यक्ष अंकुश जाधव, समिर शिरगावकर, देवगड तालुका अध्यक्ष प्रभाकर साळसकर, सुधीर अणावकर, आर.डी. कदम, निलेश जाधव आदि उपस्थित होते.

यावेळी श्री. परूळेकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष कधी झाला नाही. परंतु राज्य पातळीवरच संघर्ष लक्षात घेता मराठ्यांनी असं ठरवल आहे की, ओबीसींना मतदान करायचं नाही तर ओबीसींनी मराठ्यांना मतदान करायच नाही. म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीसह सर्व घटकांना एकत्र घेवून भविष्यातील लढाई लढण्याची तयारी ठेवली आहे. एकिकडे महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत दाखवत इतर पक्षांकडे कुणी लक्ष देत नाही हे वास्तव नाही. सिंधुदुर्गातील कुठल्याही आमदारांनी येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य असा उपयोग केला नाही. विकास कामे सुध्दा केली नाहीत. केलेली विकास कामे सुध्दा ते दाखवू शकत नाहीत. याच पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी हे तिन्ही उमेदवार काम करणार आहेत. ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी या आरक्षित समाजासाठी शासनाने उत्पन्नाची अट काढुन टाकल्याबाबत श्री. परूळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत त्या पदाधिकार्‍याचे ते वैयक्तिक मत असेल तर संशोधनात्मक विचार केला तर ओबीसींच्या नुकसानीची तयारी या महायुती सरकारनेच केल्याची टिका करण्यात आली आहे.


जाहिरात