महानायक अमिताभ बच्चन साहेब यांचा आज वाढदिवस ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
बिग बी !
महानायक !
सुपरस्टार !
पद्मभूषण !
The Star Of The Millennium !
अनेक पुरस्कारांचे धनी !
एक सुसंस्कृत भारतीय अभिनेता !
आजही आम्हाला बालपण आठवतयं. चित्रपट काय असतो हे समजण्याच्या आतच आम्ही अमिताभ बच्चन जी यांचे चाहते झालेलो; कारण त्यांच्या अभिनयाची आणि आवाजाची जादूच अशी होती की, आम्हालाही कळले नाही की आम्ही अमिताभजी यांचे चाहते झालोत. अमिताभ जी जणू अगदी घरातलीच कुणी व्यक्ती आहे असे मानायला लागलो होतो. इतक्या भारावलेल्या अवस्थेतच त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने त्यांना ‘कुली’ चित्रपटाच्या शुटिंग समयी अपघात झाला. झाले ! आमचेच काय पण अखिल भारताचे प्राण कंठाशी आलेले अशी हतबलता. विशेष म्हणजे तो काळ हा प्रसार माध्यमांचा नव्हताच मूळी. रेडिओ आणि वृत्तपत्रांतून काय त्यांच्या प्रकृती विषयी जुजबी माहिती मिळायची तेवढीच.
अमितजींची तब्येत लवकरच बरी व्हावी म्हणून नवस-सायास, उपवास करणारे केवळ आम्हीच होतो असे नव्हे तर भारतातील अगणित चाहते आमच्या सोबत होते. वेळीच उपचार झालेत आणि सोबत अखिल भारतीयांच्या दुवा. अमितजी ठिकठाक झालेत तेव्हाच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याचे आजही स्पष्ट आठवतयं, इतकी ही घटना मनावर कोरली गेलीय. विशेष म्हणजे मनमोहन देसाई यांच्या या ‘कुली’ चित्रपटाच्या मूळ कथानकात अमितजींचे इक्बाल नावाचे पात्र मरण पावते असा शेवट होता; पण अपघाताने संपूर्ण भारतातून आलेल्या प्रतिसादाद्वारे अमितजी बद्दलचे प्रेम पाहुन दस्तुरखुद्द मनमोहन देसाई जी ही गहिवरले आणि त्यांनी ‘कुली’ चित्रपटाचा दुखांत शेवट हा सुखांतात केला.
आता थोडे अमितजी विषयी. अमिताभ बच्चन जी (मूळ नाव- अमिताभ हरिवंश राय बच्चन, जन्म ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. सन १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत २०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपट निर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सन १९८४ ते सन १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते. अमितजी बद्दल आणखी बोलायचे तर, अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तरप्रदेश मधील अलाहाबाद येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या.
अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे सन २००३ मध्ये तर आईचे सन २००७ मध्ये निधन झाले. डॉ. हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्म मध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.अमितजी अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल मध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेज मध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले. ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले तेव्हा अमितजींची उंच अंगकाठी बघून आणि घोगरा आवाज ऐकून या ‘सात हिंदुस्थानी’ चित्रपटाचे हक्क ही कुणी विकत घ्यायला तयार नव्हते. मात्र प्रकाश मेहेराजींचा ‘जंजीर’ चित्रपट आला आणि अमितजींनी संथ हिंदी चित्रपटांच्या ‘जंजीर’ मधून हिंदी चित्रपटसृष्टीला बंधनमुक्त केले. या जंजीर नंतर मात्र अमितजींनी मागे वळून पाहिलेच नाही. ते अगदी आजतागायत.
चित्रपट, दूरचित्रवाणी, जाहिराती यातून ते आजही काम करीत आहेत. त्यांचे कष्ट आणि कार्यामागची भावना पाहिली असता उर भरुन येतो. आदरणीय अमितजींना, ईश्वर सदैव सुख समृध्दी, यश, किर्ती, भरभराट आणि निरोगी दीर्घायुष्य देवो ही ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना. आदरणीय अमितजी, आपणांस पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
