कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात ८ पैकी ७ उमेदवार झाले वैध

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी, महायुती, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रासप या पक्षांसह अपक्ष मिळुन एकूण ८ जणांनी ११ उमेदवारी अर्ज कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे दाखल केले होते. यातील मुंबईस्थित अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने ७ जणांचे १० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान रासपच्या महिला उमेदवार उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) यांच्या उमेदवारी अर्जातील एबी फॉर्म मध्ये त्रुटी असल्यामुळे त्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकत नाहीत, मात्र त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती काळुशे यांनी सांगितले. दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असुन त्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.  

      कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दि. २२ ते २९ ऑक्टोबर असा होता. कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी ८ जणांनी आपले ११ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र १४ अर्ज सादर झाले नाहीत. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक (रा. बिजलीनगर कणकवली) – ३, महायुतीकडून शिवसेनेचे निलेश नारायण राणे (रा.वरवडे कणकवली) – २, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर (रा.हुमरमळा अणाव) – १, बहुजन समाजवादी पार्टी कडून रविंद्र हरिश्चंद्र कसालकर (रा.कसाल) – १, रासप कडुन उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) – १, अपक्ष सौ.स्नेहा वैभव नाईक (रा.बिजलीनगर कणकवली)-१, अपक्ष वैभव जयराम नाईक (रा.पवई, कुर्ला, मुंबई उपनगर) – १, अपक्ष प्रशांत नामदेव सावंत (किर्लोस गावठाण ता.मालवण) – १ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी उमेदवार अर्ज छाननीच्या दिवशी मुंबई कुर्ला पवई मुंबई उपनगर येथील अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या उमेदवारी अर्जातील सुचकाच्या सहीला महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचे प्रतिनिधी अनंत पाटकर यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैभव जयराम नाईक यांच्या प्रतिनिधींना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एका तासाची मुदत दिली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या समक्ष सुनावणी पार पडल्यानंतर अपक्ष उमेदवारी वैभव जयराम नाईक यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. रासप उमेदवार उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ) यांच्या एबी फॉर्म मध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे श्रीमती यळाविकर यांच्या अर्जासोबतचा एबी फॉर्म अवैध ठरविण्यात आला. यामुळे येळाविकर रासप कडून निवडणूक लढवू शकत नसल्याचे श्रीमती काळुशे यांनी सांगितले. मात्र येळाविकर अपक्ष म्हणून रिंगणात राहू शकतात असेही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहिर केले.

दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतरच कुडाळ विधानसभा मतदार संघात किती उमेदवार रिंगणात राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.