अपहरण करताना वापरलेली बलेनो कार पोलिसांनी घेतली ताब्यात
विशांत पांगम सह चौघेजण अद्याप पोलिसांच्या हाती आले नाहीत
कुडाळ | प्रतिनिधी
येणे बाकी दिली नाही म्हणून कृष्णा माळी याचे अपहरण करून त्याला मारहाण करणाऱ्या सहापैकी दोघांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सोलापूर माहोळ येथील स्वप्निल भीमराव वसेकर व तेर्सेबांबर्डे येथील सुजल सचिन पवार यांचा समावेश आहे मात्र मुख्य आरोपी विशांत पांगम सह चौघे जण फरारी आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
पिंगुळी गुढीपूर येथे राहणारा आणि मूळ राहणार सोलापूर येथील कृष्णा संजय माळी यांनी गोवा येथील विव्हा हॉटेलचे मालक विशांत पांगम (रा. बांदा) यांचे ४ लाख रुपये देणे होते. या कारणावरून कृष्णा माळी याला विशांत पांगम सह सोलापूर येथील स्वप्निल वसेकर, विलास वसेकर, दीपक वाघमारे, तेर्सेबांबर्डे येथील सुजल पवार व एक अनोळखी व्यक्ती अशा सहा जणांनी याला बलेनो व स्विफ्ट गाडीमध्ये भरून त्याचे अपहरण करून कुडाळ एमआयडीसी येथे घेऊन गेले तेथे मारहाण झाल्यानंतर गोवा येथे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा मारहाण करून तेर्सेबांबर्डे येथील हॉटेल साईप्रसाद परिसरात आणून सोडले. दरम्यान याबाबत कृष्णा माळी यांनी सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील स्वप्निल वसेकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान तेर्सेबांबर्डे येथील सुजल पवार याला आज (गुरुवारी) पोलिसांनी अटक केली आहे. उद्या (शुक्रवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच या प्रकरणातील बलेनो कार ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील इतर चौघेजण फरारी आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
