गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी पक्ष व समविचारी संघटनेच्या वतीने कुडाळ येथे छेडण्यात आले आंदोलन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या विरोधात निषेधार्थ आंदोलन वंचित बहुजन आघाडी पक्ष व समविचारी संघटनेच्या वतीने छेडण्यात आले. यावेळी अमित शहा यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हाणून पाडला. यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली.

वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी अमित शहा यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या तसेच समविचारी संघटनेच्या वतीने वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी वाय. जी. कदम, वासुदेव जाधव, विजयकुमार जाधव, रामदास जाधव, प्रसाद कुडाळकर, हरिचंद्र कदम, दिपक कदम, रोशनी धामापूरकर, सूर्यकांत बिबवणेकर, अंकुश जाधव, नाना नेरुरकर, गजानन जाधव, निलेश वर्देकर, बाबा सोनवडेकर, भूषण कुडाळकर, सत्यवान साठे, वासुदेव जाधव, अंकिता कदम, प्रिया कदम, आज्ञा कदम, संजय वरावडेकर तसेच वंचित बहुजन पक्षाचे इतर पदाधिकारी तसेच समविचारी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न आंदोलन करत असतानाच पोलिसांनी मात्र हा प्रयत्न त्यांचा हाणून पाडला.

यावेळी बोलताना महेश परुळेकर यांनी सांगितले की, आर एस एस च्या मनात, पोटात जो बाबासाहेबांबद्दल द्वेष आहे तो अमित शहा यांच्या जे ओठावर आला आहे. आमच्यासाठी व देशातील हजारो कोटी जनतेसाठी बाबासाहेब हेच आमचे दैवत आहेत आणि ते दैवतच राहणार. अमित शहा यांना बाहेरच्या देशात फिरायला बंदी आहे, ते तडीपार गुंड आहेत त्यांना याच संविधानाच्या माध्यमातून अटक करण्यात आली होती व याच संविधाना च्या माध्यमातून त्यांना जामीन मिळाला. संविधानामुळे ते संसदेत निवडून गेले व मंत्री आहेत हे सर्व अमित शहा यांनी लक्षात घेतले पाहिजे. आता आहे हे सर्वजण बौद्ध समाजाला टार्गेट करत आहेत. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना झाली त्यावेळी तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. एवढं प्रशासन निर्ढावलेले आहे या सर्व घटना पाहता केंद्रातील व राज्यातील सरकार हे हुकूमशाही आणु पाहत आहे असे आरोप परुळेकर यांनी बोलतांना केले.

यावेळी विजयकुमार जाधव यांनी सांगितले की केंब्रिज युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक हा किताब देऊन गौरविले आहे. तर शहांकडे काय आहे? यांच्या कडे बघताना सिम्बॉल ऑफ गुंडगिरी असेल त्यामुळे अशा प्रकारच्या मिनद्या माणसाने बाबासाहेबांवर बोलू नये असे सांगितले.

तर यावेळी वाय. जी. कदम यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी संविधानाची रचना ही समानतेच्या धाग्यात बांधले आहे आम्ही बाबासाहेबांचे नाव घेणारच, आर एस एस संघ मनुवादी अशा विचारांच्या संघटना पक्ष व लोकांना संविधान बदलायचे होते असा आरोप केला.