वीजबिल भरा सहकार्य करा: महावितरण
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 75 हजार 193 ग्राहकांकडे 33 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे थकबाकी वसुलीच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज बिल न भरणाऱ्या 645 वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 62 हजार 387 घरगुती ग्राहकांकडे 9 कोटी 21 लाख, 5 हजार 811 व्यावसायिक ग्राहकांकडे 2 कोटी 85 लाख, 811 औद्योगिक ग्राहकांकडे 1 कोटी 83 लाख, 2572 पथदिवे ग्राहकांकडे 12 कोटी 8 लाख, 1297 सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील ग्राहकांकडे मध्ये 5 कोटी 11 लाख तर 2315 सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे 2 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज बिल थकवणाऱ्या 645 ग्राहकांची वीज जोडणी तोडली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत वीज बिल थकवणाऱ्या 645 ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आली असून थकीत वीज ग्राहकांकडे 29 लाखांची थकबाकी आहे. ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
ऑनलाईन वीज बिल भरणा करा केव्हाही व कुठूनही
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
