पिंगुळी गावासाठी रूग्णवाहिका देणार ; आमदार निलेश राणे

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहराला लागून पिंगुळी गाव आहे हे भविष्यातील उपनगर होणारे आहे या दृष्टीने गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी महोत्सवात सांगितले. तसेच त्यांनी सीएसआर फंडामधून या गावासाठी रुग्णवाहिका मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पिंगुळी ग्रामपंचायत व साई कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. नाथ पै महाविद्यालय येथे पिंगचळी महोत्सव २०२४ साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे यांनी महोत्सवाला भेट दिली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी महोत्सवाला शुभेच्छा देऊन सांगितले की, भविष्यातील पिंगुळी गाव हे उपनगर म्हणून उदयास येणार आहे. त्या दृष्टीने या गावाचा विकास झाला पाहिजे. या गावाची वाढती लोकसंख्या पाहून गावामध्ये आवश्यक त्या सेवा देण्याचे काम केले पाहिजे. या गावाच्या विकासासाठी सदैव पाठीशी आम्ही राहणार आहोत. आवश्यक तो निधी या गावाला आम्ही देऊ असे सांगून सीएसआर फंडातून गावासाठी रुग्णवाहिका देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगितले. 

यावेळी आमदार निलेश राणे यांचा सत्कार पिंगुळी गावाच्या वतीने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कुडाळकर, भाजप कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, गजानन कांदळगावकर, साधना माडये, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.