अखेर कुडाळ नगरपंचायतीने मोफत गप्पी मासे सोडले ओहोळांमध्ये

0

कुडाळ | प्रतिनिधी

अखेर कुडाळ नगरपंचायतीने आरोग्य विभागाकडून मोफत गप्पी मासे घेऊन त्याचे पैदास केंद्र निर्माण करून या केंद्रातील गप्पी मासे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व लक्ष्मीवाडी लगत असलेल्या ओहोळामधील पाण्यात सोडले. या कार्यक्रमाला सत्ताधारी व विरोधक उपस्थित असल्यामुळे शहरातील चांगल्या कामांसाठी लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे चित्र दिसले.

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहर मच्छर मुक्त करण्यासाठी गप्पी मासे आणले जातील अशी माहिती आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली होती मात्र त्यानंतर भाजपचे गटनेता विलास कुडाळकर यांनी या गप्पी माशांमध्ये सुद्धा घोटाळा होऊ शकतो हे गप्पी मासे मोफत मिळतात असे सांगितले होते त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाकडे गप्पी मासे मोफत मिळावे अशी मागणी केली होती तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील टाकाऊ कचराकुंड्यांपासून गप्पी मासे पैदास केंद्र कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून निर्माण केले कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी गप्पी मासे पैदास केंद्राला आवश्यक असणारे ऑक्सिजनचे साहित्य दिले.

दरम्यान या पैदास केंद्रामध्ये गप्पी मासे प्रशासनाने सोडल्यानंतर आज (बुधवार) हे गप्पी मासे नाल्यांमध्ये सोडण्यासाठी प्रशासनाकडून नगरसेवकांना पत्राद्वारे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, आरोग्य सभापती मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, नगरसेविका सई काळप, ज्योती जळवी, आरोग्य निरीक्षक संदीप कोरगावकर, मुकादम दीपक कदम उपस्थित होते.

यावेळी आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी सांगितले की नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च न करता कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने व मेहनत घेऊन हे पैदास केंद्र निर्माण केले तसेच गप्पी मासे आरोग्य विभागाने पुरवले आहे यामध्ये शहरातील नागरिकांना हे गप्पी मासे पुरवले जातील. हे पैदास केंद्र प्राथमिक चाचणीवर सुरू करण्यात आले आहे. तर भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की, ही बाब कौतुकास्पद असली तरी यामध्ये कर्मचाऱ्यांचा हिस्सा मोठा आहे त्यांच्यामुळे हे पैदास केंद्र उभे राहिले आहे नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च न करता गप्पी मासे व पैदास केंद्र निर्माण झाले आहे आम्ही विरोध केला होता तो या संभाव्य होणाऱ्या खर्चाला शहराच्या कोणत्याही चांगल्या कामांमध्ये आमचा विरोध असणार नाही सत्ताधारी आणि विरोधक असे न मानता शहराच्या चांगल्या कामासाठी एकत्र सोबत राहो असे सांगितले. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितलेले की, शहरातील मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच शहराच्या चांगल्या कामासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसले.