आता प्रत्येक विभागाचे प्रगती पुस्तक तयार केले जाईल :- आमदार निलेश राणे

0

कुडाळ | प्रतिनिधी

नवीन काही गोष्ट निर्माण करायची असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणची साफसफाई करणे गरजेचे आहे आणि तेच काम मी आढावा बैठकी मधून करत असल्याचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आता प्रत्येक विभागाचे प्रगती पुस्तक तयार केले जाईल आणि ते किती यशस्वी झाले ते पाहिले जाईल त्यामुळे प्रत्येक विभागाने आपले काम प्रामाणिक आणि मेहनतीने करावे अशी आशा बाळगतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

कुडाळ पंचायत समितीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सभागृह येथे पंचायत समितीचा आढावा झाला. त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर आदी पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, मागील दहा वर्षात या मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधींचा लक्ष नव्हतं. या त्रुटी आढावा बैठकीमधून दिसून आल्या. अधिकारी काम करायला तयार आहेत. पण त्यांना कोणत्या प्रकारे काम केले पाहिजे कोणत्या वेगाने काम केले पाहिजे हे मागील लोकप्रतिनिधी सांगू शकले नाहीत. पण त्यावर मी काही न बोलता आता आमदार म्हणून मला लोकांनी जबाबदारी दिली आहे. आणि ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. आढावा बैठकी मधून जे काही प्रश्न समोर आले आहेत ते मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी मी प्रयत्न करेल आणि त्यासाठी प्रशासन म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांची साथ लागणार आहे. तेव्हाच आपला यश मिळू शकते. गेली काही वर्ष या मतदारसंघाला काहीच मिळाले नाही. हा मतदारसंघ वंचित राहिला त्याला विकास प्रक्रियेत आणण्यासाठी आम्हाला मेहनत करावी लागेल असे सांगून यासाठी कालमर्यादा ठरवून त्या कालमर्यादेत किती कामे झाली आणि त्यात आपण किती यशस्वी झालो याची सुद्धा तपासणी पुढील आढावा बैठकीत घेतली जाईल. जे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे तो पाठपुरावा मी मंत्रालय स्तरावर नक्की करेन असे सांगून पूर्वी विस्कळीतपणा होता आता तो विस्कळीतपणा चालणार नाही. सर्वांना मिळून काम करावे लागेल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून काही दिवसात भारत संचार निगम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विद्युत महावितरण तसेच अनेक विभागांच्या आढावा बैठका घेऊन काम केले जाईल असे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वे प्रश्नसंदर्भात खासदार नारायण राणे यांच्याशी बोलणार

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की कोकण रेल्वेचा प्रश्न हा केंद्रस्तरावरचा आहे त्यामुळे खासदार नारायण राणे यांच्याशी बोलून त्या संदर्भात बैठक घेतली जाईल. या ठिकाणी केला जाणारा अन्याय आम्ही सुद्धा सहन करणार नाही. कोकण रेल्वे हे महामंडळ भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट करावे अशी आमची मागणी पुढील काळात राहणार आहे असे त्यांनी सांगितले तसेच अंजिवडे घाट प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.