ओरोस | प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील कृषी विज्ञान केंद्राने गेल्या आठ वर्षापूर्वी हाती घेतलेल्या नैसर्गिक शेतीला मोठे यश मिळाले आहे. केंद्र सरकारने यावर्षी नैसर्गिक शेतीला २४८१ कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे व नैसर्गिक शेतीला पाठबळ दिले आहे. भात नाचणी यासारखी शेती पिके व आंबा काजू सारखी बागायती पिके या नैसर्गिक शेती खाली आणली जाईल. 50 गटामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन नैसर्गिक शेती खाली आणली जाईल व नैसर्गिक शेतीच्या या चळवळीला आणखी गती दिली जाईल अशी माहिती किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली. यावेळी प्राचार्य विलास सावंत उपस्थित होते.
नैसर्गिक शेतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता चालना दिली आहे. 7000 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे कृषी विकासाच्या व नैसर्गिक शेतीच्या पार्श्वभूमीवर एक मेळावा झाला होता. त्यातील शेतकऱ्यांचा सुरही नैसर्गिक शेतीचा होता तत्पूर्वी किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्र व येथील कृषी महाविद्यालयाने नैसर्गिक शेती असावी त्याबाबतचे संशोधन व्हावे म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याला आता केंद्र सरकारने पाठबळ दिले असून डॉ. पंजाबराव देशमुख शेती अभियान सुरू केले आहे. आपल्या देशाला नैसर्गिक शेती वरदान ठरू शकते, विष मुक्त अन्नाची निर्मिती करणे शेती उत्पादकता वाढविणे जमिनीची गुणवत्ता टिकून ठेवणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे या प्रमुख हेतूने हे नैसर्गिक शेतीचे अभियान केंद्र शासनाने आता हाती घेतले आहे. सिंधुर्गात या अभियानाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून कृषी विज्ञान केंद्र व आत्मा या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा त्यांचे गट स्थापन करण्याचा व प्रत्यक्षात नैसर्गिक शेती निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले.
नैसर्गिक शेती कमी खर्चात होणारी व पर्यावरण संतुलन राखणारी पद्धत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टाळून त्यावरील खर्च कमी करणे हा प्रमुख उद्देश आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. त्यावर कितीतरी मोठा खर्च शासनाच्या तिजोरीवर पडत असतो. हा फार मोठा खर्च यातून कमी होऊ शकतो. हा पैसा नैसर्गिक शेतीच्या अनुदानावर थेट शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचविला जाईल असाही प्रयत्न व त्याबाबतचा पाठपुरावा शासनाकडे केला जाईल असेही या निमित्ताने ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांची कोणत्याही पिकाखालची जमीन नैसर्गिक शेतीखाली आली की त्या पिकाचे अथवा फळ पिकाचे प्रमाणीकरण होईल. नैसर्गिक उत्पादन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पिकाला दुप्पट भाव मिळेल, याचे सर्टिफिकेशनही शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे नैसर्गिक शेतीला पुढच्या काळात शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. गटाच्या माध्यमातून या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहणही ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
मार्केट यार्ड शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्र.
नांदगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड होत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, बागायतदारांसाठी विकासाचा महत्वाचा टप्पा आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र निर्माण होईल या विकासाबाबत आपण स्वागतच करतो अशी प्रतिक्रिया ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.
