पर्यटकाला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालक तन्वीर शेख याला न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी 

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथील एका हॉटेलमध्ये पुणे येथील पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालकांसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी हॉटेल मालक तन्वीर करामत शेख याला अटक करून न्यायालयात हजर केले असता कुडाळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन फेटाळला. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान याप्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात अशा प्रवृत्ती विरोधात निवेदन दिले आहे.

 मुंबई गोवा महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये पुणे येथील काही पर्यटक चहा पिण्याकरिता सकाळी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या चहामध्ये माशी पडल्याने सदर चहा बदलून द्या. असे पर्यटकांनी हॉटेल मालक यांना सांगितले. या कारणावरून हॉटेलचे मालक व त्यांचे चार कामगार यांनी पर्यटकांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामध्ये रुपेश बबन सकपाळ याला काठीने, हाताने डोळ्यावर, ओठावर मारून दोरीने बांधून ठेवले. या प्रकारामुळे पर्यटक घाबरले आणि त्यांनी पोलिसांच्या ११२ या मदत फोनवर माहिती दिली. त्या ठिकाणी पोलीस ठाण्याचे महिला पोलिस अंमलदार ममता जाधव, योगेश मुंढे त्या ठिकाणी गेले. या पर्यटकाला बांधून ठेवले होते. त्याला पोलिसांनी सोडवले. मात्र पर्यटकांनी हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला. 

एका पर्यटकाला बेदाम मारहाण झाल्याची घटना घडली असून ती गंभीर स्वरूपाची असल्याने याप्रकरणी पोलिसांच्या वतीने तक्रार देण्यात आली. सरकारतर्फे देण्यात आलेल्या या तक्रारी वरून हॉटेल मालक तन्वीर करामत शेख (वय २९), शराफत अब्बास शेख (वय ५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय १८), परवीन शराफत शेख (वय ४२), शाजमीन शराफत शेख (वय १९), तलाह करामत शेख (वय २६) सर्व राहणार झाराप खान मोहल्ला यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

एकाला अटक व न्यायालयीन कोठडी

 याप्रकरणी हॉटेल मालक तन्वीर शेख याला कुडाळ पोलिसांनी तात्काळ अटक करून आज (शुक्रवार) कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तन्वीर शेख याचा जामीन फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडी पाठवले. दरम्यान या प्रकरणातील शराफत अब्बास शेख व तलाह करामत शेख यांना अटक केली. असून उद्या (शनिवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

महिलांना दिली नोटीस तर एकाला करणार बाल न्यायालयात हजर 

या प्रकरणांमध्ये दोन महिला व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यात अल्पवयीन असलेला अब्बास उर्फ साहिल शराफत शेख याला उद्या (शनिवारी) बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर या प्रकरणातील परवीन शराफत शेख व शाजमीन शराफत शेख या महिलांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक गणेश क-हाडकर, पोलीस अमलदार ममता जाधव, प्रीतम कदम, योगेश मुंढे यांनी केलेली आहे. 

सकल हिंदू समाज झाला आक्रमक 

या प्रकरणी कुडाळ शहरातील सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये अशा वृत्तीला ठेचून काढले पाहिजे पर्यटकांना अशाप्रकारे होणारी मारहाण ही गंभीर आहे त्यामुळे आमच्या जिल्ह्याची बदनामी होत आहे. शुल्लक कारणावरून अशी मारहाण झाली तर भविष्यात या जिल्ह्यात येणारा पर्यटक कमी होतील आणि येथील आर्थिक उलाढाल कमी होईल अशा मुजोर लोकांवर कडक कारवाई करावी तसेच हॉटेल बंद करावे जर या बाबत कारवाई झाली नाही तर हिंदू समाज गप्प बसणार नाही असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रमाकांत नाईक, विवेक पंडित, शेखर नाडकर्णी, धीरज परब, समीर सराफदार, शिवप्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, दिनेश सावंत, हेमंत जाधव, सुधीर राऊळ, प्रसन्न गंगावणे, बाळा पावसकर, रत्नाकर जोशी, चंदन कांबळी, शुभम देसाई, अरविंद करलकर, अमित सरनोबत आदी उपस्थित होते.