रत्नागिरी | प्रतिनिधी
रविवार, शनिवारची सुट्टी, अधिक इतर सणांच्या सुट्ट्या, सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना मिळत असतात. यामुळे त्यांना काम करायला कमी दिवस मिळतात. यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना या सुट्ट्यांमध्ये दिली जाणारी शनिवारची सुट्टी रद्द केल्यास सरकारी कामे वेगाने होतील, असे ॲड. अमेय परुळेकर यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे.
सध्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवारसह सण व उत्सवाच्या सुट्टयांबरोबरच शनिवारची सुट्टी देखील आहे. २०२५ सालचा विचार करता वर्षाचे एकूण ३६५ दिवस आहेत. त्यामध्ये ५२ रविवार व ५२ शनिवार आहेत. हे १०४ दिवस व महाराष्ट्र सरकारने यावर्षी २५ सुट्ट्या या सण व उत्सवांच्या जाहीर केल्या आहेत. यापैकी २० सुट्टया या सोमवार ते शुक्रवार दरम्यानच्या आहेत. म्हणजे ३६५ दिवसातील १०४ + २० = १२४ सुट्ट्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना सिक व कॅज्युअल सुट्ट्याही मिळत असतात. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे किती दिवस सुट्टीमध्ये जातात याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना जी शनिवारची सुट्टी दिली जाते ती सुट्टी रद्द करावी, अशी मागणी अॅड. अमेय परुळेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे. तसेच यासाठी आवश्यक असेल तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही अॅड. परुळेकर यांनी केली आहे.
