कुडाळ | प्रतिनिधी
“सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र” या अनंत मुकुंद सावंत प्रभावळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दि. २५ एप्रिल २०२५ रोजी रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, कुडाळ बाजारपेठ येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजिला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथमित्र श्री. अनंत आपाजी वैद्य आहेत. पुस्तक कोकणी रानमाणुस श्री. प्रसाद गावडे यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.
कार्यक्रमाला कुडाळ नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर, कुडाळचे तहसीलदार श्री. विरसिंग विसावे, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्मिता लक्ष्मण सुरवसे व श्री. अरविंद रामचंद्र शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती आहे.
लेखक हे कुडाळ गावचे सुपुत्र असून त्यांचे शालेय शिक्षण एम.एस्सी., एम.ए. (तत्वज्ञान) आहे. त्यांनी संमोहन, ज्योतिषरत्न, किर्तनालंकार व जैव विविधता असे वैविध्यपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रम केले असून त्यांनी सीमाशुल्क अधीक्षक या पदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांचा “श्रीमद बळी महाराजा फिलॉसॉफीकल फाउंडेशन” हा न्यास असून न्यासाच्या नियोजित उद्दिष्टांपैकी एक महाराष्ट्राला जागतिक संस्कृतीचे माहेरघर सिद्ध करणे व त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आहे.
न्यासाच्या सदर उद्दिष्टानुसार हे पुस्तक असून त्यातील विक्रीतून येणारी अर्धी रक्कम ही न्यासाला देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील दायमाबाद इथून पाकिस्तानातील बालाकोट पर्यंत पसरलेली सिंधू संस्कृती ही गाव रहाटीतील कोकणी माणसाने कशी निर्माण केली त्याचे विविधांगी चित्रण या पुस्तकात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने विशद केले आहे.
नाविन्यपूर्ण माहितीने खचाखच भरलेले हे पुस्तक वाचकांसाठी पर्वणी ठरेल. यास्तव पुस्तक प्रेमींनी, अभ्यासकांनी व कोकणावर प्रेम करणाऱ्यांनी रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथ संग्रहालय (टोपीवाले), कुडाळ व श्रीमद बळी महाराजा फिलॉसॉफीकल फाउंडेशन” न्यास, घावनळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र” या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.