बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट याची हद्दपारी

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश

 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील गुन्हेगार सिध्देश शिरसाट यास दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातुन हद्दपारीचे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवू नये नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे, या करीता तात्कालीन पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी बिलांद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदुम यांना दिलेले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत केली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे हद्दीतील सिध्देश अशोक शिरसाट (वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ) याचेविरुध्द खून, सरकारी नोकरास मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारू वाहतूक करणे, जुगार चालवणे, लोकांना धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याची माहीती उपलब्ध झाल्याने त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्याकरीता अहवाल उप विभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांचेकडे पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार सराईत गुन्हेगार सिध्देश अशोक शिरसाट (वय ४३ वर्षे, रा कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ) याचे हद्दपारीचे प्रकरणाची सुनावणी उप विभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी घेवून त्या वरील सिद्धेश शिरसाट सराईत गुन्हेगार यास दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हार या तीन जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्द‌पार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. सिद्धेश शिरसाट हा गुन्हेगार सद्या तो निवती पोलीस ठाणकडील दाखल असलेल्या गुन्हयात न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी येथील कारागृहामध्ये आहे. तो न्यायालयीन कोठडीतुन बाहेर येताच त्यास सदर हद्दपारीचे आदेशाची त्वरीत बजावणी करुन उप विभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांचे आदेशान्वये त्यास सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्याकडून करण्यात येणार आहे.

भविष्यात सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन अशा गुन्हेगारांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.

सदरची कारवाई ही तात्कालीन पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम पोलीस अंमलदार, प्रितम कदम, कृष्णा केसरकर, संजय कदम, रुपेश सारंग, उषा आईर यांनी केलेली आहे.

कुडाळ पोलीस ठाणे अभिलेखावर ज्या इसमांवर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध बावतचे गुन्हे दाखल आहेत व त्यांच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही अशा गुन्हेगारांचे अभिलेखाचे पडताळणी करून इसमांवर अशाप्रकारे कारवाई करण्याचे सातत्य ठेवण्यात येणार आहे.