जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार मोफत पाठयपुस्तके

 

ओरोस,२८ मे २०२५

 

 समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खाजगी अनुदानित तसेच अंशत: अनुदानितच्या इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100% उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरु केली आहे. इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माध्यम निहाय, इयत्ता निहाय व विषय निहाय मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत.

 यावर्षापासून इयत्ता 1 ली साठी CBSE पॅटर्न राबविण्यात येणार असून त्याची पुस्तके इ. 1 ली ला पुरविण्यात येणार आहेत. इ.1ली ते 5 वी साठी 29805 विद्यार्थी व इ.1 ली ते 8 वी च्या 20003 विद्यार्थी अशा एकुण 49808 विद्यार्थ्यांना 303600 एवढी पुस्तक संच दि.16.06.2025 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी वितरीत करण्यात येणार आहेत.  

 मोफत पाठ्यपुस्तके योजना सन 2025-26 करिता विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांची वाहतूक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून तालुकास्तरावर मोफत पाठयपुस्तके प्राप्त झालेली आहेत. तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तके वाहतूक संबंधित तालुका स्तरावरून करण्यात येणार आहे.

  शाळेचा पहिला दिवस हा गावातील पदाधिकारी /अधिकारी / पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके समारंभपूर्वक दि.16.06.2025 रोजी वितरण करण्यात येणार आहेत.   

तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेली मोफत पाठयपुस्तके

 

अ.क्र. तालुका पाठयपुस्तक संख्या

1. देवगड 7388

2. दोडामार्ग 2364

3. कणकवली 8507

4. कुडाळ 10455

5. मालवण 5462

6. सावंतवाडी 8853

7. वैभववाडी 2532

8. वेंगुर्ले 4247

एकुण 49808