*जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सदिच्छा भेटीवेळी शिवसेना शिष्टमंडळाची अवैध धंद्यांवर कडक कारवाईची मागणी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक, गावागावात दारूची विक्री, गुटखा व अमली पदार्थांची विक्री, जुगार, ऑनलाईन जुगार,ठिकठिकाणी मटका घेणे असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची सदिच्छा भेट घेऊन केली आहे. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. कारवाईबाबत श्री. दहिकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरम्यान जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मोहन दहिकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, श्री. सावंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. रावले उपस्थित होते.
शिवसेना शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असून गावागावात खुलेआम दारूची विक्री केली जातआहे. स्थानिक पोलिसांना देखील याची माहिती आहे मात्र त्यावर कारवाई केली जात नाही.गुटखा, अमली पदार्थ यांची देखील राजरोस विक्री सुरु आहे. जुगार, ऑनलाईन जुगार,ठिकठिकाणी मटका घेणे देखील सुरु आहे. हे सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी आपण स्वतःलक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षआपल्या सोबत आहे. तसेच जिल्ह्यातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती होण्यासाठी आपल्या विभागामार्फत अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
