मनोरूग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आई-वडीलांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला व मनोरूग्ण मुलाच्याच औषध गोळ्या व झुरळ मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये आई सौ.कांचन संजय म्हापसेकर (५८) यांचे निधन झाले असून वडील संजय दाजी म्हापसेकर (६३) यांच्यावर जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना ३० मे रोजी रात्री ९ वा.सुमारास तळेबाजार चांदोशी येथे घडली.याप्रकरणी मनोरूग्ण मुलगा सिध्देश संजय म्हापसेकर (३०) या संशयिताविरूध्द दाखल फिर्यादीनुसार देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तळेबाजार चांदोशी येथील फिर्यादी संजय म्हापसेकर हे पत्नी कांचन व मुलगे सिध्देश व पुर्वांग यांच्यासमवेत राहत होते.सिध्देश हा मनोरूग्ण असून त्याचे मानसिक स्वास्थ बिघडलेले असते.त्याला दारूचेही व्यसन आहे.त्याच्यावर रत्नागिरी मनोरूग्णालयामार्फत उपचार सुरू आहेत.मात्र तो औषध गोळ्या घेत नव्हता व वारंवार घरात वाद निर्माण करीत होता. तसेच तो स्वत:चा खर्चासाठी आई वडीलांकडे सतत पैसे मागत होता.या त्रासाला कंटाळून अखेर ३० मे रोजी रात्री ९ वा.सुमारास संजय म्हापसेकर व त्यांची पत्नी सौ.कांचन यांनी मनोरूग्ण मुलगा सिध्देश याचा औषध गोळ्या व झुरळ मारण्याचे औषध प्राशन केले.यावेळी त्यांचा दुसरा मुलगा पुर्वांग हा घरात नव्हता.३१ मे रोजी सकाळी ७.३० वा.सुमारास अत्यवस्थेत असलेल्या संजय म्हापसेकर यांनी त्यांचे सख्खे भाऊ गजानन म्हापसेकर यांना फोन करून माझी व माझ्या पत्नीची तब्येत बरी नसल्याचे सांगीतले.त्यानंतर गजानन यांनी संजय म्हापसेकर यांच्या घरी येत संजय व त्यांचा पत्नी कांचन या दोघांनाही तात्काळ जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी कांचन या उपचार सुरू करण्यापुर्वीच मयत झाल्या होत्या.तर संजय यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान संजय म्हापसेकर यांनी मनोरूग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून मी व माझ्या पत्नीने मनोरूग्ण मुलाच्या झोपेचा गोळ्या व झुरळ मारण्याचे औषध प्राशन केले अशी फिर्याद देवगड पोलिसांकडे दिली त्यानुसार देवगड पोलिसांनी संशयित सिध्देश म्हापसेकर याच्याविरूध्द भारतीय न्याय संहीता १०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.
दरम्यान कांचन म्हापसेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.संजय म्हापसेकर हे सध्या राहत्या घरी कुक्कूटपालनाचा व्यवसाय करीत असून यापुर्वी ते मुंबई येथे एलआयसी मध्ये कार्यरत होते.सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी तळेबाजार चांदोशी येथे छोटा व्यवसाय करण्याचे ठरविले.मात्र मनोरूग्ण मुलाचा त्रासाला कंटाळून त्यांनी पत्नी समवेत आपले जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला.यात पत्नीचे दुर्दैवी निधन झाले.
